बीड -मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला बीड पोलिसांनी जेरबंद केले आहे. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपीना अटक झाली आहे.
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. ता. नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचा खुन झाला होता. नवव्या दिवशी फरारी चाटेला पकडण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेसह इतर दोघे अद्यापही फरार आहेत.चाटे याला पोलिसांनी बीड ते छत्रपती संभाजीनगर महामार्गांवर अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली.
मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे ता. ता. नऊ डिसेंबर रोजी केज जवळून अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर विष्णू चाटे मयत देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या संपर्कात होता. तुमच्या भावाला आणून सोडायला लावतो असे तो सांगत होता.
दरम्यार, अपहरणानंतर केज पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास उशिर केला. संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळल्यानंतर सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे यांच्यावर गुन्हा नोंद झाला. मात्र, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी आणि मुख्य सुत्रधारांवर गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी मस्साजोग तालुक्यातील लोकांनी ता. नऊ रोजीच्या रात्रीपासून ते ता. १० रोजीच्या रात्री पर्यंत आंदोलन केले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा केज तालुकाध्यक्ष असलेल्या विष्णू चाटेवरही गुन्हा नोंद झाला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पवनचक्की व्यवस्थापकाला जिवे मारण्याची धमकी देऊन दोन कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडसह विष्णू चाटे आणि खुन प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद झाला. दरम्यान, यापूर्वी पोलिसांनी प्रतीक घुले, जयराम चाटे व महेश केदार या तिघांना अटक केली होती. बुधवारी (ता. १८) सकाळी विष्णू चाटेला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
विष्णू चाटेची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या केज तालुकाध्यक्षपदावरुन यापूर्वीच हाकालपट्टी झाली आहे.
Leave a Reply