अंबाजोगाई -राजस्थानी मल्टीस्टेट पटसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा अपहार करून मागील वर्षभरापासून फरार असलेल्या चंदूलाल बियाणी याने आज अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पतकरली. बियाणी याने ठेवीदारांच्या तब्बल चारशे कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
वाढीव व्याजदाराचे आमिष दाखवून शेकडो ठेवीदारांच्या ठेवी हडप केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चंदूलाल बियाणी यांनी आज सोमवारी (दि.02) अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पत्करली.
ज्ञानराधा मल्टीस्टेट पाठोपाठ लागलीच राजस्थानी मल्टीस्टेटचा घोटाळा उघडकीस आला होता. ठेवीदारांना वाढीव व्याजदाराचे आमिष दाखवून जमा केलेल्या शेकडो कोटींच्या ठेवी परत करण्यास असमर्थ ठरलेल्या चंदूलाल बियाणीसह सर्व संचालक मंडळावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. त्यानंतर मागील अनेक महिन्यापासून चंदूलाल बियाणी फरार होता. अखेर सोमवारी त्याने स्वतःहून अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पत्करली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अद्याप न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून याबाबत सविस्तर माहिती थोड्यावेळानंतर प्राप्त होईल.
बीड जिल्ह्यात गेल्या वर्ष दोन वर्षात ज्ञानराधा, जिजाऊ माँ साहेब, राजस्थानी मल्टीस्टेट, साईराम अर्बन अशा अनेक मल्टीस्टेट बंद पडल्या. आठ ते दहा लाख ठेवीदारांचे जवळपास पाच ते सात हजार कोटी रुपये यामध्ये अडकले आहेत.
यापूर्वी ज्ञानराधाचे सुरेश कुटे, आशिष पाटोदेकर, यशवंत कुलकर्णी, साईनाथ परभणे, बबन शिंदे यांना अटक झालेली आहे. मात्र बियाणी हे गेल्या वर्षभरापासून फरार होते, अखेर त्यांनी स्वतः न्यायालयात हजर होण्याचा निर्णय घेतला आहे.
Leave a Reply