News & View

ताज्या घडामोडी

यावेळी हिशोबच करणार -जरांगे पाटील!

नारायणगड -यावेळी आपल्याला हिशोब करावाच लागेल, आमच्या नादि लागू नका, आम्ही झुकणार नाहीत, यावेळी उलथा पालथ करावीच लागेल असं म्हणत मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी लाखो समाज बांधवाना आगामी काळातील वाटचाल कशी असेल हे सूचित केले.

नारायणगडावर होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या मेळावासाठी राज्यभरातून विराट गर्दी झाली आहे. लाखोंचा मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर पोहोचला आहे. त्यामुळे नारायणगडावरून मनोज जरांगे पाटील कोणता संदेश देणार? याकडे राजकीय वर्तुळासह मराठा समाजाचे सुद्धा लक्ष होते.

दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच समाजावर अन्याय होणार असल्यास शांत बसणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले की एकवेळा याठिकाणी झालेली गर्दी कॅमेरामनमधून लोकांना दाखवू द्या. एकदा त्यांचं दाताड पडू द्या; कार्यक्रमच झाला म्हणून समजा, अशा शब्दामध्ये त्यांनी टोला लगावला. या नारायण गडाने कधीच जातीची शिकवण दिली नसून समतेचा संदेश दिला असल्याचे ते म्हणाले.

14 महिन्यांपासून आरक्षणासाठी झुंजत आहोत

जरांगे पाटील म्हणाले की, मला संपवण्यासाठी अनेक षड्यंत्र रचण्यात आले आहेत. मला पूर्ण घेरलं आहे. मी या गडावरून एकही शब्द खोटं बोलणार नाही. मला होणाऱ्या वेदना माझ्या समजाला सहन होत नाहीत. समाजाला होणाऱ्या वेदना मलाही सहन होत नाहीत. मला त्रास झाला तर माझा समाज रात्रंदिवस ढसाढसा रडतो. पण माझा नाईलाज आहे. या राज्यातील सर्व बांधवांना सांगतो की तुमच्यामुळं कलंक लागू देऊ नका. पक्ष-पक्ष करू नका. सारखं नेता नेता करू नका. माझ्या समाजाच्या लेकराला कलंक लागू देऊ नका.

त्यांनी सांगितले की, लढायला शिका. हिंदू धर्माने अन्यायाविरोधात शिकवलं. कायदा आणि संविधानाने अन्यायाविरोधात लढण्याचं शिकवलं आहे. अन्याय होत असेल तर उठाव करायचा हे संविधानाने शिकवलं आहे. आज गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून उठाव चालू आहे. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी केली जात आहे. इथे जातीचा संबंध नाही. प्रत्येक जातीने राज्य आणि केंद्राची सुविधा घेतली. आम्ही 14 महिन्यांपासून आरक्षणासाठी झुंजत आहोत. तुमच्यामुळे आरक्षणाला धक्का लागत आहे, असे काहीजण सांगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *