News & View

ताज्या घडामोडी

वादग्रस्त तहसीलदार मरकडं यांचे आधारकार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र बोगस!

बीड – नाशिकचे तहसीलदार बाळू मरकड यांचे आधारकार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र देखील बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यासहित आठ अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी सुरु असून लवकरच एम पी एस सी कडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

तथाकथित पूजा खेडकर प्रमाणेच, खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करीत राज्यसेवेच्या परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी पदरात पाडून घेणाऱ्या बाळू मरकड याने त्यासाठी केलेले एक-एक प्रताप उघड होत आहे. राज्यसेवा आयोगाला सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र बाळू मरकड याने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळविले आहे.

त्यासाठी त्याने नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमान येथील खोटा पत्ता दिला आहे. त्याचप्रमाणे, पुराव्यासाठी खोटा पत्ता असलेले बनावट आधारकार्ड तयार केले होते. या साऱ्या खोट्या पुराव्यांच्या आधारे त्याने नाशिक जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र मिळविले.
सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील लोणविरे ग्रामपंचायतीत ग्रामसेवक असलेल्या बाळू दिगंबर मरकड याने २०२१ पूर्वी राज्य सेवेची परीक्षा दिली. त्यावेळी त्याने सिंगल डिसॲबेलिटी प्रकारातून परीक्षा दिली होती. त्यानंतरची परीक्षा मरकड याने मल्टीपल डिसॲबेलिटी प्रकारात दिली. त्यासाठी त्याने बहिरेपणासह दृष्टिदोष असे मल्टिपल डिसॲबेलिटी (बहुविकलांग) दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून परीक्षा दिली. हीच बाब जाणकारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या आहेत.

एवढेच नव्हे, तर दृष्टीदोष व बहिरेपणाचे प्रमाण हे २० टक्क्यांपेक्षाही कमी असताना त्याने राज्यसेवा आयोगाला दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये ४७ टक्के दाखविले आहे. २०२२ च्या राज्यसेवेच्या निकालानंतर त्याची नियुक्ती तहसिलदार पदी करण्यात आली. परंतु त्यानंतर त्यास पुन्हा वैदयकीय चाचणीसाठी सांगण्यात आले. परंतु त्याने चाचणीसाठी टाळाटाळ केल्याचेही आता समोर येते आहे. या साऱ्या प्रकारामुळे बाळू मरकड याच्यासमोरील अडचणीत भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *