मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यावर ज्या पद्धतीने ताशेरे ओढले आहेत ते पाहता या दोघांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करत आपण राजीनामा दिला कारण ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यासमोर मला विश्वास दर्शक प्रस्ताव मांडायचा नव्हता अस स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
राज्यातील सत्तासंघर्ष बाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे पहिल्यांदाच मातोश्रीवर आले आहेत. देशात एकूणच लोकशाहीची हत्या होतेय की काय? असं चित्र दिसतंय. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वच विरोधी देशप्रेमी पक्ष आणि जनता एकत्र करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. ते बळकट करण्यासाठी हे दोघं आले आहेत.”
न्यायालयानं म्हटलं मी राजीनामा दिला नसता तर मी मुख्यमंत्री झालो असतो पुन्हा. पण मी माझ्यासाठी लढत नाहीये. या देशाला आपल्याला वाचवायचं आहे.”
आजच न्यायालयाचा निर्णय आला आहे. मला एका गोष्टीचं समाधान आहे. मी म्हणत होतो की हा निर्णय शिवसेनेचा नसून लोकशाहीचा आहे. आज न्यायालयाने दिलेल्या निकालात सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडंनागडं राजकारण, त्याची चिरफाड केली आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल महोदयांची भूमिका अयोग्य होती. राज्यपालांच्या भूमिकेचंही वस्त्रहरण झालं आहे. राज्यपाल ही यंत्रणा आत्तापर्यंत आदरयुक्त यंत्रणा होती.
पण त्याचे धिंडवडे ज्या पद्धतीने शासनकर्ते काढत आहेत, ते पाहिल्यावर राज्यपाल यंत्रणा अस्तित्वात ठेवावी की नाही, हा मोठा विचार सर्वोच्च न्यायालयापुढे न्यायला हवा. तूर्त, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नव्हता वगैरे म्हटलंय. पण अपात्रतेचा निर्णय त्यांनी अध्यक्षांवर सोपवला असला, तरी माझ्या शिवसेनेचा आदेश अंतिम असेल हेही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे
माझ्या राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकता समोर ठेवून मी घेतला होता. आताच्या मुख्यमंत्र्यांत थोडीशी नैतिकता असेल तर आता त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे.”कायद्यानुसार मी दिलेला राजीनामा चुकीचा ठरू शकतो. पण नैतिकतेचा विचार करता ज्या लोकांना माझ्या पक्षानं सर्वकाही दिलं, त्यांनी गद्दारी केली आणि मग त्यांनी माझ्यावर अविश्वास आणला तर त्याचा मी सामना का आणि कसा करू? महाराष्ट्रात तर आता सरकारच नाहीये. जर या मुख्यमंत्र्यांमध्ये नैतिकता असेल, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. जसा मी दिला.”सगळं घेऊनही त्यांनी माझ्या पाठीत वार करावा आणि माझ्यावर अविश्वास आणावा हे मला मान्य नाही. विश्वासघात करणाऱ्यांकडून माझ्यावर अविश्वासदर्शक ठराव यावा हे मला अमान्य आहे.”
Leave a Reply