मेरठ- मेरठ,गजियाबाद यासह अनेक शहरात धुमाकूळ घालणारा कुख्यात गुंड अनिल दुजाना उर्फ अनिल नागर याला एसटीएफने चकमकीत ठार केले आहे. यूपी एसटीएफने मेरठमध्ये ही कारवाई केली आहे. अनिल हा मोठा गुन्हा करण्याचा कट आखत असल्याची माहिती एसटीएफला मिळाली होती. त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला. याच क्रमाने तो मेरठमध्ये लपल्याची माहिती मिळाली. यावेळी झालेल्या चकमकीत तो ठार झाला.
उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेत आल्यानंतर यूपी मधील गुंडाराज संपवण्याचे काम सुरू केले आहे.काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड अतिक अहमद याच्या हत्येनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र योगी यांनी गुंडांच्या विरोधात सुरू असलेली कारवाई थांबणार नसल्याचे वारंवार सांगितले आहे.
अनिल दुजाना याच्यावर खंडणी, लूटमार, जमीन बळकावणे, शस्त्रास्त्र कायद्यासारख्या गंभीर कलमांतर्गत 62 गुन्हे दाखल आहेत, त्यात 15 खुनाचा समावेश आहे. यूपी पोलिसांनी त्याच्यावर रासुका आणि गँगस्टर कायदाही लावला होता. नुकतीच गौतम बुद्ध नगरमधील गुंडांची यादी पोलिसांनी उघड केली. त्यात त्याच्या नावाचाही समावेश होता.
अनिल दुजाना यानीच गँगस्टर सुंदर भाटीवर AK 47ने गोळीबार केला होता. अनिल दुजानाने त्याच्या साथीदारांसह सुंदर भाटीवर गाझियाबादच्या भोपुरा भागातील एका फार्महाऊसमध्ये त्याच्या मेव्हण्याच्या लग्नात हल्ला केला, ज्यामध्ये गँगस्टर रणदीपनेही त्याला साथ दिली होती. त्या हल्ल्यात सुंदर भाटी बचावला, पण तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2014 मध्ये सुंदर भाटी टोळीने बदला घेण्यासाठी अनिल दुजाना याच्या घरावर हल्ला केला, ज्यामध्ये अनिल दुजानाचा भाऊ जय भगवान मारला गेला.
Leave a Reply