News & View

ताज्या घडामोडी

संपूर्ण बीड जिल्हा दुष्काळी जाहीर !

मुंबई -जून पासून पावसाळ्याच्या अखेरपर्यंत पावसाचे पडलेले प्रमाण तसेच कोरड्या दुष्काळाचे मापदंड त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील पाणीसाठे या सर्वांचा विचार करून बीड जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 52 महसुली मंडळांचा आज नव्याने दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आला आहे.

यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीचे आज मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, संदीपान भुमरे आदींसह मदत व पुनर्वसन तसेच महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बीड जिल्ह्यातील धारूर, वडवणी व अंबाजोगाई या तीन तालुक्यांचा महसूल विभागाने दि.31 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाद्वारे याआधीच दुष्काळग्रस्त तालुक्यांचा यादीत समावेश केलेला आहे.

त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील उर्वरित परळी, आष्टी, गेवराई, बीड, पाटोदा, शिरूर कासार, केज व माजलगाव या 8 तालुक्यातील 52 महसुली मंडळांचा दुष्काळी यादीत नव्याने समावेश करण्यात येणार असून, याबाबत आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात कुठेही समाधानकारक वा पुरेसा पाऊस झालेला नाही. सर्व प्रमुख जलस्रोत रब्बी हंगामाच्या तोंडावरच कोरडे पडतील अशी परिस्थिती आहे. पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी व चारा अशा अनेक समस्या आगामी काळात जिल्ह्यात उद्भवणार आहेत. जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांचा दुष्काळी म्हणून विचार झाल्याने या भागाला शासनाकडून दुष्काळाच्या मापदंडानुसार मदत मिळेल, ही एक समाधानाची बाब आहे. यासाठी मदत व पुनर्वसन विभागाचे व महसूल विभागाचे विशेषकरून आभार मानतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्यात राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेच्या माध्यमातून नुकताच सुमारे 3 लाख 90 हजार शेतकऱ्यांना 72 कोटी रुपये इतका (प्रत्येकी 2000) पहिला हफ्ता वितरित करण्यात आला होता. त्यापाठोपाठ 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना नुकताच 241 कोटी रुपये पिकविमा 25% अग्रीम नुसार मंजूर करण्यात आला असून, त्याचे वितरणही नुकतेच सुरू झाले आहे. त्यापाठोपाठ सर्व 11 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश मिळाल्याने निश्चितच शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

या महसुली मंडळांचा समावेश

आष्टी – आष्टी, कडा, टाकळसिंग, दौलावडगाव, धामणगाव, पिंपळा, धानोरा

बीड – पाली, म्हाळसजवळा, नाळवंडी, राजुरी (न), पिंपळनेर, पेंडगाव, मांजरसुंबा, नेकनूर, लिंबागणेश, चौसाळा, बीड

गेवराई – गेवराई, मादळमोही, जातेगाव, पाचेगाव, धोंडराई, उमापूर, चकलांबा, सिरसदेवी, रेवकी, तलवाडा

केज – केज, युसूफ वडगाव, ह.पिंप्री, होळ, विडा, बनसारोळा

माजलगाव – माजलगाव, गंगामसला, किट्टी आडगाव, तालखेड, निथरूड, दिंदरूड

परळी – परळी, धर्मापुरी, सिरसाळा, नागापूर, गाडे पिंपळगाव

पाटोदा – पाटोदा, दासखेड, थेरला, अंमळनेर

शिरूर कासार – शिरूर कासार, रायमोह, तींतरवणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *