बीड -राज्यात सर्वत्र धुळवड उत्साहात साजरी केली जात असताना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा यावर्षी देखील कायम राखली गेली. केज तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी असलेल्या शिवाजी गालफाडे यांची गावातून मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला.
बीड शहरापासून साधारण 60 ते 70 किमी अंतरावर केज तालुक्यातील विडा हे गाव आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या गावात हि गेल्या 90 वर्षापासूनची हि परंपरा सुरु आहे. धुलीवंदनाच्या दिवशी शोधून ठेवलेल्या जावयाला गाढवावर बसून मिरवणूक काढली जाते.
त्यासाठी अगोदरच्या दिवसापासून ही जावई शोध मोहीम सुरु असते. त्यामध्ये म्हातारा तरुण याचा विचार न करता जावई असणे आवश्यक असते. गावातील मंडळी उत्साहाने जावई शोध मोहिमेत सहभाग घेतात. शोधला, शोधला म्हणत अचानक एखाद्या जावयावर धाड टाकून पकडून ठेवले जाते. आणि दुसऱ्या दिवशी त्याची गदर्भ सवारी केली जाते.
विडा येथील रहिवाशी असलेल्या अनंतरावं देशमुख यांनी नव्वद वर्षांपूर्वी स्वतःच्या जावयाची चेष्टामस्करीत गाढवावरुन मिरवणूक काढली होती तेव्हापासून ही परंपरा सुरु आहे. दरवर्षी आठ दिवस अगोदर पासूनच जावयाच्या शोधासाठी गावातील तरुण फिरत असतात. यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची मिरवणूक काढुन कपडे आणि सोन्याची अंगठी दिली जाते. मात्र यावर्षी सोन्याचे भाव वाढल्याने केवळ कपड्याचा आहेर जावयाला दिला जाणार आहे. स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीला सुरुवात झाली.
यावर्षीचा मान शिवाजी गालफाडे या जावयाला मिळाला. गालफाडे हे मूळचे केज तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी आहेत. पण लग्नानंतर ते सासरवाडी विडा येथेच स्थायिक झाले. ते विडा गावातील बाबुराव दुनघव यांचे जावाई आहेत. गावात त्यांनी घर बांधले आहे. रोजंदारी करून ते चरितार्थ चालवतात. धुळवडीच्या दिवशीच तरुणांचा मोर्चा त्यांच्या घराकडे वळला आणि त्यांनी गदर्भराजवरुन त्यांची मिरवणूक काढली. आपला या मिरवणुकीसाठी नंबर लागेल असे त्यांनीही वाटले नव्हते. रंगाची उधळण करत, गळ्यात जुन्या चप्पल-बुटांचा हार घालत गाढवावरुन ही मिरवणूक काढली.












Leave a Reply