परळी – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपल्यावर माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्यामार्फत घातपात केला जात असल्याचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यास प्रत्युत्तर देत थेट आरोप करणारे जरांगे, आरोपी आणि माझी स्वतःची देखील थेट सीबीआय मार्फत चौकशी केली जावी, त्याचबरोबर अशा प्रकारच्या आरोपांची सत्यता पडताळून सत्य महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर यावे यासाठी ब्रेन मॅपिंग व नार्को टेस्ट करावी, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे.
मनोज जरांगे यांनी जे आरोपी म्हणून पुढे केले आहेत, ते त्यांचेच अनेक वर्ष जुने सहकारी आहेत. त्यातल्या एकावर मागील वर्षी एप्रिल महिन्यात हल्ला झाला तेव्हा जरांगेंनी त्याला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती, म्हणजे आपलेच जवळचे लोक पाठवायचे त्यांना कुणाच्या तरी मार्फत ओळख करून घ्यायला लावायचे, काहीतरी फेक रेकॉर्ड वगैरे बनवायचे आणि आरोप करून खळबळ उडवून एखाद्याची प्राणांतिक बदनामी करायची, हा कावा आता ओळखला आहे, त्यामुळे जरांगे यांनी केलेले आरोप म्हणजे निव्वळ थोतांडगिरी आहे असाही प्रत्यारोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.
मी मागील 30 वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणामध्ये सक्रिय आहे. माझ्या समाजापेक्षा मराठा समाजात माझे मित्र व सहकारी जास्त आहेत, पहिल्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रत्येक लढ्यात मी बरोबरीने सहभाग घेतला. मात्र प्रथमच ओबीसी महा एल्गार मेळाव्यातून मी इडब्लूएस आरक्षण कसे अधिक फायद्याचे आहे यावरून बोललो तसेच ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या बाबतीत बोललो, तेव्हापासून मला कामापेक्षा जास्त टार्गेट केले जात आहे. ओबीसींच्या न्यायाची आणि गरजू व गरीब मराठा विद्यार्थ्यांची वैचारिक बाजु मांडली म्हणून मला संपवायला निघालेत, असा थेट आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
आज घात पाताच्या गोष्टी करणाऱ्यांनी माणसात माणूस ठेवला नाही. झुंड आणि दादागिरी करून राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना शिव्या, भुजबळ साहेबांना शिव्या, मला शिव्या, पंकजाताई ला शिव्या, लक्ष्मण हाकेंवर हल्ला, नवनाथ वाघमारे यांच्या वर हल्ला, त्या पवन करवरचा तर जीव घ्यायला निघाले होते, ते कुणाचे समर्थक होते? जीवघेणे हल्ले करून त्याचे समर्थन करत मारहाणीचा असुरी आनंद घेणारे लोक तुमचेच होते, असा घणाघात करत धनंजय मुंडे यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला. मनोज जरांगे ऑन एअर धनंजय मुंडे संपवून टाकतो, त्याचा नायनाट करतो, त्याची संपूर्ण जात संपवून टाकतो, ओबीसी नेत्यांना संपवून टाकतो, ब्राम्हणांना संपवून टाकतो, अशी उघड धमकी दिली जाते, ही धमकी नाही का? त्यावर सरकार कारवाई करणार नाही का? सरकार त्यांचे सर्व काही ऐकते मग आम्ही ओबीसी म्हणून आम्हाला किंमत नाही का? असा सवाल करताना धनंजय मुंडे यांनी जरांगेना आव्हान देत मला गोळ्या घालून मारून टाका, माझा समाज, ओबीसी समाज सगळ्यांना गोळ्या घालून मारून टाका आणि तुम्ही एकटेच राज्य करा, असे भावनिक आवाहन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला गावगाडा, सामाजिक विन विस्कटनार नाही यासाठी अनेकवेळा आरोप होऊन देखील मी गप्प राहिलो, जरांगे यांना सरकारचा प्रतिनिधी म्हणून दोनदा भेटलो, पण कधीच त्यांना कुठे विरोध केला नाही, विरोध हा केवळ आरक्षणाच्या विचारापुरता मर्यादित होता मात्र मनोज जरंगे या व्यक्तीला धनंजय मुंडे हा व्यक्ती पृथ्वीतलावर जिवंत नको आहे असे वाटते असे धक्कादायक विधान धनंजय मुंडे यांनी केले. त्याचबरोबर मनोज जरांगे आणि त्यांच्या वाळू माफिया टोळी कडून आपल्याही जीवाला धोका असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले.
मनोज जरांगे यांना काही नेत्यांनी झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी केली आहे, मी तर या पत्रकार परिषद व्दारे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याबरोबरच देशातील सर्वात सेफ समजली जाणारी एसपीजी सुरक्षा जरांगेना द्यावी, अशी मागणी सरकारकडे करतो, सोबतच ओबीसी समाजाच्या लढ्यातील छगन भुजबळ साहेब, गोपीचंद पडळकर साहेब, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, किंवा माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता अशा लोकांचे जीव वाचावेत, याचीही काळजी सरकारने घ्यावी आणि राहिला विषय मला संपवायचा तर इथल्या मातीतील लोकांच्या पदरी माझ्या आई वडिलांनी मला वाहिलेले आहे, त्यामुळे लोकांच्या मध्ये राहून माझा जीव गेला तरी मला फरक पडत नाही, असे भावनिक विधान धनंजय मुंडे यांनी केले आहे.
दरम्यान तुमचेच लोक प्लॅन करून पाठवून त्यांनी ओळखी करायच्या काहीतरी कामे सांगायची, गाड्या तर मला अनेकजण मागतात, अनेक आंदोलने झाली तेव्हा मी अनेकांना गाड्यांची व्यवस्था करून दिली आहे, त्याचा अर्थ जीव घेण्याची प्लॅनिंग? म्हणजे निव्वळ थोतांडगिरी आहे, असे सांगताना आजकाल ए आई तंत्रज्ञानाने काहीही बनावट केले जाते, त्यामुळे काही बनावट रेकॉर्डिंग, व्हिडीओ किंवा काही तयार करून माझ्यावर एका समाजाकडून हल्ले घडवून आणण्याचा व मला संपवण्याचा हा कट असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आता या प्रकरणातील संपूर्ण सत्य बाहेर यावे, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि बसुही देणार नाही, असेही धनंजय मुंडे यांनी ठासून सांगितले.
यावेळी माजी आ. संजय भाऊ दौंड, ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील, युवक नेते अजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस परळीचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे, परळीचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शकील कुरेशी, सूर्यभान नाना मुंडे, पिंटू मुंडे, प्रा. मधुकर आगाव, विनोद जगतकर, राजाभाऊ पोळ, लक्ष्मण पोळ, अय्युब भाई, माणिक भाऊ फड, अनंत इंगळे यांसह पदाधिकारी आदी उपस्थित होते.












Leave a Reply