बीड – गोदावरी पाटबंधारे विभागाचा सावळा गोंधळ बीड जिल्ह्यातील गेवराई माजलगाव आणि परळी तालुक्यातील साधारणपणे 50 ते 60 गावांच्या मुळावर उठला आहे. तीन दिवसापासून जायकवाडीचे धरण 98% पेक्षा अधिक भरलेले असतानाही पाटबंधारे विभागाने 60 ते 70 हजार क्यू सेक्स पाण्याचा विसर्ग केला, ज्यामुळे आता रविवारी तीन लाख क्यूसेक्स पर्यंत विसर्ग करण्याची वेळ आली आहे याचा फटका गेवराई माजलगाव आणि परळीला बसणार आहे तरी नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे.
बीड जिल्ह्यातील गेवराई माजलगाव आणि परळी तालुक्यामधून गोदावरी नदी वाहते या नदीच्या काठावर कुरण पिंपरी पासून ते ढालेगाव पर्यंत जवळपास 60 गावे वसलेले आहेत. जेव्हा जेव्हा गोदावरी नदी पात्राला पूर येतो तेव्हा या गावांचा संपर्क तुटतो.
2006 साली आणि 2016 मध्ये गोदावरी पात्रात अडीच ते तीन लाख पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता ज्यामुळे कुरण पिंपरी बोरगाव राक्षस भुवन पांचाळेश्वर राजापूर पांढरवाडी रामपुरी अशा किमान 50 ते 60 गावांना पाण्याचा वेढा पडला होता. 2006 मध्ये मोठ्या प्रमाणात महापूर आल्यामुळे हजारो लोकांचे स्थलांतर करण्याची वेळ आली होती त्यावेळी तत्कालीन आमदार अमरसिंह पंडित आणि त्यांच्या शारदा प्रतिष्ठानच्या वतीने लोकांचे स्थलांतर आणि त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच माजी मंत्री बदामराव पंडित व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने देखील पूरग्रस्ताना मदतीचा हात देण्यात आला होता.
यावर्षी में महिन्यापासून पाऊस सुरु झाला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नाशिक, नगर भागात झालेल्या पावसामुळे पैठणच्या नाथसागर धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाल्याने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गोदावरी पात्रात 50 हजार ते दीड लाख क्यू सेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दरम्यान रविवारी दुपारनंतर अडीच लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात सुरू करण्यात आला असून सायंकाळपर्यंत तो तीन लाख ते साडेतीन लाख क्यू सेक्स पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.
पाटबंधारे विभागाने चार दिवसापासून धरण 95 टक्के पेक्षा अधिक भरलेले असतानाही नियोजन न केल्यामुळे त्याचा फटका गेवराई माजलगाव आणि परळी तालुक्यांना बसत आहे.












Leave a Reply