बीड-अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांच्या पथकावर गेवराई तालुक्यातील वाळू माफियांनी दगडफेक केली. यामध्ये तहसीलदार यांच्या सोबत असलेला एक कर्मचारी जखमी झाला.
पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथील गोदावरी नदीत गेल्या काही दिवसापासून रात्री व दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूची तस्करी सुरू आहे. याची माहिती मिळाल्यानंतर नवीन रुजू झालेले तहसीलदार सारंग चव्हाण हे स्वतः बुधवारी महसूल विभागाच्या वाळू विरुद्ध पथकातील मंडळ अधिकारी गणेश सोनवणे, केकान, तलाठी राम केंद्रे, कोतवाल सतीश दळवे, चालक भारत धारकर या पथकासोबत हिरडपुरी येथील गोदावरी नदीत अचानक कारवाईसाठी दाखल झाले. या ठिकाणी गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील वाळू तस्कर पैठण तालुक्याच्या हद्दीतून अवैधरित्या वाळू उपसा करून ट्रॅक्टरमधून वाहतूक करताना आढळून आले.
यावेळी पथकातील महसूल कर्मचाऱ्यांनी सदरील ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी घेऊन जात असताना महसूल पथक व वाळू तस्कर यांच्यात मोठा वाद निर्माण झाला. यावेळी वाळू तस्करांनी पथकावर तुफान दगडफेक केली.दगडफेकीत कोतवाल सतीश दळवे यांच्या डोक्याला दगडाचा मार लागल्यामुळे ते जखमी झाले .त्यामुळे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी हिरडपुरी येथील गोदावरी नदीतून एक ट्रॅक्टर सह मोटर सायकल जप्त करून पैठण येथे तहसील कार्यालयात आणण्यात आली असून जखमी कोतवालावर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात पाचोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Leave a Reply