बीड -बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नेमण्यात आलेल्या एस आयटी ने 2012 ते 2025 या काळात नियुक्ती दिलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कागदपत्रे 30 ऑगस्ट पर्यंत अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हजारो शिक्षकांचे रुजू रिपोर्ट शाळेत सापडत नसल्याने हे शिक्षक हैराण झाले आहेत. त्या काळातील मुख्याध्यापक यांना शोधून त्यांच्या जुन्या तारखेत सह्या घेण्याचे उद्योग सुरु झाले आहेत.
नागपूर सहित गडचिरोली, अमरावती, जळगाव या जिल्ह्यात बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून हजारो शिक्षकांनी नोकरी मिळवल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर या प्रकरणात सरकारने नियुक्त केलेल्या एस आयटी ने आतापर्यंत वीस ते बावीस अधिकारी शिक्षक आणि संस्थाचालक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्या अटकेची कारवाई केली आहे.
या सगळ्या प्रकरणानंतर बीड सहित संपूर्ण महाराष्ट्रात बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना नियुक्ती दिल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या. त्याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्पेशल एस आयटी ची घोषणा केली.
एस आयटी प्रमुखांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी उपसंचालक यांना तातडीने कागदपत्र ऑनलाइन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षक यांनी सर्व संस्था चालकांना 30 ऑगस्ट 2025 पर्यंत शिक्षकांचे रुजू रिपोर्ट नियुक्ती आदेश संच मान्यता आदेश विनाअनुदानित करून अनुदानित वर बदली आदेश यासहित इतर कागदपत्रे अपलोड करण्याचे आदेश दिले.
ही कागदपत्रे अपलोड न केल्यास पगार बंद करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. शिक्षण विभागातील या आदेशानंतर प्रत्येक संस्थेने त्या त्या मुख्याध्यापकांना शिक्षकांचे कागदपत्र अपलोड करण्याची आदेश दिले आहेत. मात्र शेकडो शिक्षकांचे रुजू रिपोर्ट अथवा नियुक्त आदेश शाळेच्या दप्तरात सापडत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास तीन ते चार हजार शिक्षकांचे 2012 ते 2016 या दरम्यानचे रुजू रिपोर्ट सापडत नसल्याने या शिक्षकांनी त्या काळात सेवेत असलेल्या व सध्या रिटायर झालेल्या मुख्याध्यापकांच्या घरी चकरा मारणे सुरू केले आहे. काही मुख्याध्यापक तर संभाजीनगर लातूर पुणे या ठिकाणाहून बीडमध्ये बोलावून घेतले असून त्यांच्याकडून मागील तारखेत रुजू रिपोर्ट तयार करून घेण्यासाठी ची धडपड सुरू झाली आहे.
नागपूर जळगाव अमरावती नंतर सगळ्यात मोठा शिक्षक भरती घोटाळा हा बीड जिल्ह्यात झालेला असून हजारो शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी तयार करून तसेच काही शिक्षकांना न्यायालयात पाठवून रुजू करून घेण्यात आलेले आहे. यामध्ये संस्थाचालक मुख्याध्यापक संबंधित शाळेचा क्लार्क शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांच्या संगणमत आहे.
या शिक्षक भरती प्रकरणांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असून पैसे देऊनही रुजू रिपोर्ट शाळेकडून उपलब्ध करून दिले जात नसल्यामुळे शिक्षक मंडळी हैराण झाले आहेत. अनेकांनी पैसे घेणाऱ्या संस्थाचालकांच्या घरी चकरा मारायला सुरुवात केली असून भीक नको पण कुत्रा आवर अशा पद्धतीने नोकरी नको पण चौकशीचा ससेमीरा पाठीशी नको अशा भावना व्यक्त केल्या आहेत.












Leave a Reply