बीड -नागपूर बोगस शालार्थ आयडी प्रकरणात चार महिन्यापासून फरार असलेल्या वेतन अधीक्षक निलेश वाघमारेला अखेर अटक करण्यात आली आहे. बोगस शालार्थ आयडी प्रकरणात वाघमारे हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. २०१९ ते २०२५ पर्यंत या माध्यमातून शासनाचे कोट्यवधी रुपये लाटण्यात आले. या प्रकरणात नीलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले. या संपूर्ण घोटाळ्याचे लोण राज्यभर पसरले आहे. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकास मान्यता दिल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार करण्यात आली होती.
विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालानुसार, जिल्ह्यात २०१९ पासून सुमारे ५८० प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यतेचे तसेच, शालार्थ आयडी प्रदान करण्याच्या आदेशांची कोणतीही शहानिशा न करता, बनावट शालार्थ आयडी प्रदान करून नियमबाह्य पद्धतीने वेतनास पात्र नसलेल्यांना वेतन अदा करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये नीलेश वाघमारे दोषी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे शासनाने वाघमारे यांना पुढील कारवाई होईपर्यंत निलंबित केले होते. यानंतर या प्रकरणात अनेक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. परंतु, वाघमारेला आतापर्यंत अटक होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केला जात होता. मात्र, अखेर पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली.












Leave a Reply