बीड -राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार ज्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः बोगस कामांचा धुमाकूळ घातला आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली रक दोन नव्हे तर दहा ते पंधरा कोटी रुपये उडवण्यात आले आहेत. या माध्यमातून अधिकाऱ्यांनी स्वतःचे अन गुत्तेदारांचे उखळ पांढरे केले आहे.
बीड जिल्ह्यात अधिकारी राज असल्याप्रमाणे कारभार सुरु आहे. सार्वजनिक बांधकामं विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र तोंडे, उपअभियंता चंद्रकांत बोराडे, शाखा अभियंता ठाकूर, गव्हाणे यांनी पोलीस मुख्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस अधीक्षक रेस्ट हाऊस, जिल्हा रुग्णालय, जिल्हा शल्य चिकित्सक निवासस्थान, कृषी कार्यालय यावर दुरुस्तीच्या नावाखाली दहा दहा लाखाचे तुकडे पाडून दहा ते पंधरा कोटींची कामे केल्याचे दाखवले आहे.
शासकीय कार्यालयात फर्निचर खरेदी, सेफ्टीक टॅंक दुरुस्ती, निवासस्थान दुरुस्ती यासाठी कोट्यावधी रुपये उधळून शासनाची फसवणूक केली आहे. विशेष बाब म्हणजे ही कामे केवळ कागदोपत्री झाल्याचे दाखवून हे पैसे अधिकारी आणि गुत्तेदार यांनी वाटून घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद भेटल्यानंतर अजित पवार यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तोंडे सारखे अधिकारी असतील तर शासनाच्या तिजोरीवर घातले जाणारे दरोडे थांबणार कधी अशी चर्चा आहे.












Leave a Reply