बीड -नागपूर येथील बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांना एस आय टी ने अटक केली आहे. या दोघांनी मिळून तीनशे पेक्षा जास्त बोगस शालार्थ आयडी तयार करून शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचे समोर आले आहे.
राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी कथित घोटाळा प्रकरणी जिल्हा परिषद नागपूर येथील शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे (प्राथमिक) व रोहिणी कुंभार (माध्यमिक) यांना अटक झालीय. या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना सायबर पोलिसांनी अटक केली असली तरी मात्र, या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांची न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
एकाचवेळी दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील अपात्र शिक्षक भरती व बनावट शालर्थ आयडी कथित घोटाळा प्रकरणी सदर पोलीस स्टेशन येथे विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व रोहिणी कुंभार या दोघांना अटक करण्यात आली.
शालार्थ आयडी कथित घोटाळा प्राथमिक शिक्षण विभागातील असून, सिद्धेश्वर काळुसे यांच्या कार्यकाळात एकूण १५४ न्याय प्रविष्ठ शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मूळ शालार्थ आयडी आदेश निर्गमित झाले नसताना सुद्धा त्यांनी स्वतः चे आर्थिक फायद्यासाठी त्यांचे वेतन काढण्याची पुढील प्रक्रिया राबवली. रोहिणी कुंभार या पूर्वी येथे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या येथील २१ मार्च २०२२ ते १५ मार्च २०२४ दरम्यानच्या कार्यकाळात एकूण २४४ शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मूळ शालार्थ आदेश निर्गमित झाले नसताना त्यांनी स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी वेतन काढण्याची प्रक्रिया राबवली. यामुळं त्यांचे वेतन काढण्यात येऊन,शासनाची अंदाजे १०० करोड पेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक झाली, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलाय. यावरून काळुसे व कुंभार यांना या गुन्ह्यात गुरुवारी अटक करण्यात आली.
ज्याप्रमाणे नागपूर, जळगाव, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यात बोगस शिक्षक भरती झाली तशीच भरती बीड जिल्ह्यात देखील झाली आहे. बीडच्या दोन्ही शिक्षणाधिकारी यांची चौकशी सुरु झाली आहे. अनेक संस्थाचालक हे मुंबई ला जाऊन मॅनेजमेंट लागते का यासाठी प्रयत्न करत आहेत. काही संस्थाचालकांनी किमान पाच तर कमाल दहा कोटी रुपये मागील थकीत वेतन देखील उचलून घेतले आहे. यामध्ये त्यांना पे युनिट च्या अधिकाऱ्यांनी लक्ष्मीदर्शन घेत मदत केली आहे. ज्या ज्या संस्थाचालकांनी कोट्यावधी रुपये थकीत वेतन उचलले आहे त्यांची देखील चौकशी सुरु झाली आहे.
शालार्थ आयडी तयार करण्याचे सर्व अधिकार शिक्षण उपसंचालक कार्यालयास आहेत. शिक्षक नियुक्ती नंतर मान्यतेसह आवश्यक कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर मुख्याध्यापकांच्या सहीने दोन प्रस्ताव सादर केले जातात. पैकीच एक प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालय आणि दुसरा शिक्षण उपसंचालक यांना सादर केला जाणे आवश्यक आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील ६३३ शिक्षकांचे प्रस्ताव हे शिक्षणाधिकारी कार्यालयात सादरच करण्यात आले नाही. थेट शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर करुन, शालार्थ आयडी तयार करण्यात आला. वेतन प्रक्रियेसाठी आलेल्या फाईलवर प्रक्रियेचा भाग म्हणून रोहिणी कुंभार यांनी काऊन्टर सही केली. यावरून पोलिसांनी त्यांचा या गुन्ह्यात सहभाग दाखवला.
आम्ही सगळी मॅनेजमेंट लावली आहे, त्यामुळे आम्हाला काहीच त्रास होणार नाही अशा पद्धतीने सध्या हे संस्थाचालक वागत आहेत. मात्र मराठवाड्यातील उपसंचालक, शिक्षणाधिकारी हे देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने बीड जिल्ह्यातील संस्थाचालकांची झोप उडाली आहे. या संस्थाचालकांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी धावपळ सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.












Leave a Reply