News & View

ताज्या घडामोडी

raj thackeray and uddhav thackeray 055214550

शिवसेना -मनसे एकत्रिकरणाची घोषणा!

मुंबई -मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांनी आगामी काळासाठी एकत्रच कामं करण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. अनाजी पंतांनी आमच्या दोघांतील अंतरपाट दूर केला आहे. आता यापुढे आम्ही दोघ मिळून मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा देऊ असे म्हटलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आम्हाला एकत्र आणण बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीस यांनी केलं असं म्हणत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित विजयी सभेत ठाकरे बंधूंनी एकजुटीचं प्रदर्शन करत मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार जाहीर केला. ही घटना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

भाषेच्या लढ्याला मोठं यश

महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्र मागे घेतल्यानंतर मराठी भाषेच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करताना सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. “मराठी भाषेला कमकुवत करण्याचा डाव होता, पण आमच्या एकजुटीने तो हाणून पाडला,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना, “महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवणाऱ्यांना आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना आता जनता धडा शिकवेल,” असा इशारा दिला. मराठी सक्तीच्या मुद्द्यावर काही जणांनी कोर्टात धाव घेतली असली, तरी मराठी जनतेचा आवाज दडपता येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्ताधाऱ्यांना दिलं खुलं आव्हान

या सभेचा सर्वात महत्त्वाचा क्षण होता तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना दिलेलं खुलं आव्हान. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं, “आम्हाला वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं सत्ताधाऱ्यांचं धोरण होतं. पण आता आम्ही दोघे भाऊ एकत्र आलोय, आणि यांना फेकून देण्याची वेळ आली आहे!” त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करताना सांगितलं की, “बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे. आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, आणि आम्ही हिंदुत्व कधीच सोडलं नाही.” या वक्तव्यातून त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा खणखणीतपणे समाचार घेतला.

आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणूस कसा एकवटतो याचे चित्र उभं राहिले असते. पण नुसतं मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जवळपास २० वर्षानंतर उद्धव आणि मी एकत्र येत आहे. जे बाळासाहेब ठाकरें यांना जमलं नाही, जे इतर कोणालाही जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं, असे राज ठाकरे म्हणाले.

आमच्याकडे रस्त्यावरची सत्ता…

महाराष्ट्राकडे, मराठीकडे कोणी वेडेवाकडे बघायचं नाही. हिंदीचं अचानक कुठुन आलं समजलंच नाही. लहान मुलांवर जबरदस्ती केली जाते. कोणाला विचारायचं नाही. सत्ता आणि बहुमतावर सगळ लादायचं. तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानभवनात पण, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर, असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

भाषेचा प्रश्न येतो कुठे?

ठाकरेंची मुले इंग्रजी मीडियममध्ये शिकली, असं सांगितलं जातं. पण, देवेंद्र फडणवीस इंग्रजीमध्ये शिकून मुख्यमंत्री झाले, दादा भुसे इंग्रजीमध्ये शिकून शिक्षणमंत्री झाले. तुमच्यातला कडवटपणा तुम्ही शिक्षण कोठून घेतलं यात नसतो तर, तो आत असावा लागतो. बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे इंग्रजीमध्ये शिकले, आता त्यांच्या मराठी प्रेमावर शंका घेणार का? बाळासाहेब इंग्रजीमध्ये शिकले पण मराठीचा अभिमान त्याच्यात कधी तडजोड केली नाही. लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले म्हणून काय त्यांच्या हिंदूत्वावर शंका घेऊ का? असा सवाल त्यांनी केला.

“सावध राहा, यापुढे जातीमध्ये विभागायला सुरू करतील”

यापुढे त्यांचं राजकारण जातीमध्ये विभागायला सुरू करतील. मराठी म्हणून कधी एकत्र येऊ देणार नाहीत. मीरा भाईंदरला व्यापाराच्या कानाखाली मारली, त्यामध्ये एक गुजराती आणि एक मराठी निघाला, त्यात गुजराती माणसाला मारलं असं दाखवलं. पण, अजूनतर काहीचं केलं नाही. विनाकारण मारामारी करायची गरज नाही पण, जास्त नाटक केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. यापुढे सर्वांनी सावध आणि सतर्क राहा. यापुढे कोणत्या गोष्टी घडतील कल्पना नाही. पण, ही मराठीसाठीची एकजूट कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं, अशी आशा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *