News & View

ताज्या घडामोडी

Engineering course 1728394821693 1728394821948

बारावी नंतर काय? ब्रँच निवडताना ही काळजी घ्या!

बीड – बारावीचा निकाल लागला असून विद्यार्थी इंजिनियर व्हायचं पण कोणती ब्रँच निवडायचो, कॉलेज कोणतं निवडायचं अशा विचारात आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळतं नसल्याने करिअर बाबत भविष्यात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा विद्यार्थ्यांनी काही बाबतीत विचार करून पावले टाकल्यास निश्चित फायदा होऊ शकतो.

काही विद्यार्थी चांगली ब्रँच मिळवतात परंतु महाविद्यालय फारसे नावाजलेले नसते, तर काहींना उत्तम महाविद्यालय मिळते परंतु हवी ती ब्रँच मिळत नाही. अशा वेळी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते.
सर्वप्रथम, आपली रँक किंवा पर्सेंटाइल लक्षात घेऊन वास्तववादी पर्याय समजून घेणे गरजेचे आहे. सीईटी, जेईई किंवा इतर परीक्षांनंतर प्रवेश प्रक्रिया विविध टप्प्यांमध्ये होते. सीईटी सेलची कॅप प्रोसेस, जोसा, सीसॅब, बिट्सॅट इत्यादी पोर्टल्सवर मागील वर्षांचे कटऑफ तपासल्यास, आपल्याला कोणत्या महाविद्यालयामध्ये कोणती ब्रँच मिळू शकते? याचा अंदाज येतो.
त्यानंतर, विद्यार्थ्यांनी आपली आवड व करिअरचे ध्येय यांचा विचार केला पाहिजे. कोणत्या विषयात आपली खरी रुची आहे, कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, सिव्हिल की नवीन क्षेत्रं, जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशिन लर्निंग, ब्लॉक चेन, इंटरनेट ऑफ थिंग्स, सायबर सिक्युरिटी की रोबोटिक्स? आपल्याला पुढे प्लेसमेंट हवे आहे की उच्च शिक्षण घ्यायचं आहे? स्पर्धा परीक्षा, संशोधन, किंवा स्टार्टअपचा विचार आपण करतोय का? या सगळ्या गोष्टींचा अभ्यासपूर्वक विचार करूनच ब्रँच निवडावी.
ब्रँच महत्त्वाची की महाविद्यालय?
याचं उत्तर ‘दोन्ही’ असं असलं तरी, प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती वेगळी असते. एखाद्या विशिष्ट विषयात आवड असेल, तर त्या ब्रँचला प्राधान्य द्या. ती कमी नावाजलेल्या महाविद्यालयात मिळत असेल तरीही. तुम्ही अनिश्चित असाल, तर चांगल्या महाविद्यालयात मिळणाऱ्या ब्रँचमध्ये प्रवेश घेणे फायदेशीर ठरू शकते.
कारण त्या महाविद्यालयाची प्लेसमेंट, वातावरण, रेप्यूटेशन, ॲल्युमिनी सपोर्ट, इंडस्ट्री लिंकेजेस व एक्सपोजरचा फायदा आपल्याला मिळतो. शिवाय कुठल्याही शाखेतून कोडिंग प्रोग्रॅमिंग शिकून, ‘आयटी’त जाता येते, हे मागील पंचवीस वर्षात अनेकांच्या बाबतीत पाहायला मिळेल.
ब्रँच निवडताना
अभ्यासक्रम, भविष्यातील संधी, इंडस्ट्रीतील मागणी, उच्च शिक्षणाच्या संधी, नोकरी, व्यवसाय किंवा स्टार्टअपच्या संधी, त्या शाखेत होणारा सॉफ्टवेअरचा वापर इत्यादींचा विचार होऊ शकतो.
महाविद्यालय निवडताना
मानांकन व रँकिंग (नॅक, एनबीए, एनआयआरएफ रँकिंग), ऑटोनॉमस की नॉन ऑटोनॉमस, संलग्न महाविद्यालय की खासगी विद्यापीठ, तेथील प्लेसमेंट रेकॉर्ड्स, फॅकल्टी, लॅब्स, स्टुडन्ट क्लब, मिळालेल्या इंटर्नशिप, कोडिंग प्रोग्रॅमिंग कल्चर, महाविद्यालयाची स्थापना, घरापासूनचे अंतर, होस्टेल, वार्षिक फी, मागील वर्षीचे कटऑफ आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट या मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवे.
तुमच्या निर्णय प्रक्रियेत मदत करण्यासाठी, राउंड सुरू होण्यापूर्वी मागील वर्षीच्या कटऑफप्रमाणे मिळणाऱ्या महाविद्यालयांना भेटी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांसोबत संवाद, अधिकृत संकेत स्थळांवरून माहिती, तसेच सिनिअर्स किंवा करिअर कौन्सिलर्स यांचा सल्ला उपयोगी होऊ शकतो.
निष्कर्ष
इतरांच्या दबावाखाली, पीयर प्रेशरमुळे महाविद्यालय व ब्रँचचा निर्णय घ्यायला नको. तुमची आवड, क्षमता आणि भविष्याचा विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. आपल्या पर्सेंटाइल व रँकवर मिळणाऱ्या योग्य महाविद्यालय व ब्रँचची योग्य सांगड घातल्यास, पुढचं करिअर अधिक सोपं, स्पष्ट व यशस्वी होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *