नागपूर -बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी एस आय टी ने भाजप नेते तथा संस्थाचालक दिलीप धोटे यांना अटक केली आहे. धोटे यांनी अनेक बोगस शिक्षकांची नियुक्ती केल्याचे उघड झाले आहे. बोगस शालार्थ आयडी तयार करून या शिक्षकांना नियुक्ती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिलीप धोटे असं अटक करण्यात आलेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. दिलीप धोटे हे विठ्ठल-रुख्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत.
शिक्षक भरती घोटाळ्याच्या या एकट्या प्रकरणाच्या तपासात प्रत्येक शिक्षकाकडून लाखो रुपये नोकरी लावण्यासाठी घेण्यात आले. हे पैसे दिलीप धोटे यांनी घेतल्याचा पोलिस विभागाच्या एसआयटीच्या पथकाला संशय आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी, वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यानेच या प्रकरणातील बनावट आयडी तयार केल्याचेही तपासातून उघड झाले आहे. दिलीप धोटे हे कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथील भाजप नेते आहेत. त्यांच्या संस्थेच्या कळमेश्वर तालुक्यात प्रतिभा उच्च प्राथमिक शाळा आणि धापेवाडा पब्लिक स्कूल अशा दोन शाळा आहेत.
पोलिसांनी दिलीप धोटे यांना ५ शिक्षकांचे बनावट आयडी तयार केल्याप्रकरणी अटक केली आहे. दिलीप धोटे यांनी काही वर्षांपूर्वी ८ शिक्षकांची बोगस कागदपत्रांच्या आधारे शाळेत नियुक्ती करून अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे शालार्थ आयडी तयार केले होते. या घोटाळा प्रकरणातच त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर दिलीप धोटे यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात संस्था चालकांना अटक करण्याचे सत्र नागपूर पोलिसांकडून सुरू आहे. आतापर्यंत शिक्षक भरती घोटाळ्यात ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश जण हे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी असून काही नोकरीसाठी पैसै घेणारे दलाल आहेत. आतापर्यंत ४ शिक्षण उपसंचालक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर २० ते २२ जणांना टप्प्या टप्याने अटक करण्यात आली. सध्या शिक्षण संस्थाचालक हे पोलिस विभागचा रडारवर आहेत. या प्रकरणात गोंदियातील संस्था चालकाला अटक करण्यात आली होती.
नागपूर प्रमाणेच बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती झालेली आहे, याची स्वतंत्र चौकशी सुरु झाली असून प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या दोन्ही शिक्षणाधिकारी यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यांनंतर संस्थाचालक यांची चौकशी होणार आहे.
Leave a Reply