बीड- यंदा ऊसतोडणी मुकादम आणि वाहतूकदरांकडून साखर कारखान्यांची दोनशे कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सर्वाधिक ३२ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. मागील पंधरा वर्षांत राज्यातील साखर कारखानदारांची दोन हजार कोटी रुपये ऊसतोडणी मुकादम व वाहतूकदारांनी बुडविले आहेत. दरवर्षी ऊसतोडणी करारातील पाच टक्के रक्कम बुडीत जाते.पण, यंदा हे प्रमाण वाढले आहे.
कारखाने ऊसतोडणीसाठी थेट ऊसतोडणी मजुरांशी करार करीत नाहीत. मुकादम आणि वाहतूकदारांशी करार करतात. वर्षांनुवर्षे असेच चालत आले आहे. पण अलिकडे बोगस मुकादम आणि वाहतूकदारांचे पेव फुटले आहे. उसाच्या तुटवडय़ामुळे कारखान्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.
करार मुकादम आणि वाहतूकदारांशी केला असला तरीही सामान्य ऊसतोडणी मजूर वेठीस धरले जात आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतूकदाराने फसवणूक केली तर मुकादम आणि मजूर कायद्याच्या कचाटय़ात अडकतात. धुळे, नंदूरबार जिल्ह्यांतील अधिवासी ऊसतोडणी मजुरांवर कोल्हापूर, सोलापूर आणि कर्नाटकात गुन्हे नोंद झालेले आहेत. त्यांची वाहने कारखान्यांनी बेकायदा अडवून धरली आहेत.
सामान्य ऊसतोडणी मजूर प्रामाणिकपणे काम करतो. पण, मुकादम आणि वाहतूकदारांकडून त्यांची फसवणूक होत आहे. यंदा हंगाम सरासरी १२० दिवस चालला, हंगाम १५० दिवस चालला असता तर कदाचित इतका गंभीर प्रश्न निर्माण झाला नसता,अस मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
कारखानदारांच्या चुकीचा सामान्य ऊसतोडणी मजुरांना फटका बसतो. विनाकारण गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलिसांकडून कारखानदारांच्या हिताचे संरक्षण केले जाते. मजुरांना मारहाण होणे, डांबून ठेवणे, वाहने जबरदस्तीने अडविणे असे प्रकार होत आहेत.यावर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र पोलीस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असा आरोप कामगार संघटना यांनी केला आहे.
Leave a Reply