News & View

ताज्या घडामोडी

शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक!

नागपूर -बोगस शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आणणारे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनाच या प्रकरणात अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर प्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक भरती घोटाळा झाला असून याची देखील चौकशी सुरु झाल्याने संस्थाचालकांचे धाबे दनानले आहेत.

नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली. उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार करण्यात आली होती.
प्राथमिक माहिती अहवालानुसार, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने फेब्रुवारी २०२५ मध्ये शिक्षण आयुक्तांना अहवाल सादर केला होता. उपसंचालक कार्यालयाने २११ प्राथमिक शिक्षक, २ मुख्याध्यापक, १८ कनिष्ठ लिपिक, १३ शिपाई अशी २४४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी दिली होती. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी वंजारी यांच्या अहवालाच्या आधारे कठोर भूमिका घेत तपासणी सुरू केली.

नागपूर सहित विदर्भात अनेक जिल्ह्यात अशाच पद्धतीने शिक्षक भरती करण्यात आली. त्याचसोबत मराठवाड्यात आणो विशेषत बीड जिल्ह्यात झालेल्या बोगस शिक्षक भरतीची देखील चौकशी सुरु झाली आहे. बीडचे प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी फुलारी आणि शिंदे यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्त यांची समिती नेमल्यामुळे संस्थाचालक हादरले आहेत.


यासाठी २०१९ ते २०२५ पर्यंत नागपूर जिल्ह्यातील संशयित प्राथमिक शाळांमधील ‘शालार्थ आयडी’चा तपास सुरू केला होता. परंतु, आता वंजारी यांनाच अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वंजारी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होण्यापूर्वी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी होते.


या दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी असलेले मृत सोमेश्वर नैताम यांची खोटी स्वाक्षरी करून २०१० ते २०१४ या काळात शिक्षक रुजू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच, त्यांचे ‘शालार्थ आयडी’ २०१९ ते २०२५ या काळात निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे वंजारी यांना अटक करण्यात आली असून या दिशेने तपास केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *