बीड- शाळा सुरू व्हायला आठवडा शिल्लक असताना बाजारात वह्या पुस्तके खरेदी करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे.मात्र यंदा 10 ते 40 टक्के किंमत वाढल्याने पालकांचे बजेट कोलमडून पडले आहे हे नक्की.
जागतिक बाजारपेठेत कागदाच्या वाढलेल्या किमतीची झळ शालेय शिक्षणातील पाठ्यपुस्तके व वह्यांना बसली आहे. सध्या बाजारात दहावी-बारावीची नवी पाठ्यपुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी साधारण 70 ते 80 रुपयांना मिळणारी पुस्तके यंदापासून 100 ते 115 रुपयांना, तर 140 ते 190 रुपयांना मिळणारी पाठ्यपुस्तके आता 170 ते 240 रुपयांना बाजारात उपलब्ध आहेत.
केवळ पुस्तकेच नाही तर वह्यांमध्येही डझनामागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. काही दुकानांत जुन्या पुस्तकांचा साठा असल्याने पालक नव्या पुस्तकांच्या ऐवजी जुनीच पुस्तके खरेदी करत असल्याचे बाजारातील सध्याचे चित्र आहे.
राज्यातील सर्व शाळांंमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली चार भागातील एकात्मिक पाठपुस्तके पथदर्शी स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व पाठ्यपुस्तकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक, पाठ, कविता यांच्या शेवटी वहीची एक दोन पाने जोडली जात आहेत. या पानांवर विद्यार्थ्यांकडून वर्गात शिक्षक शिकवताना, अध्यापन सुरू असतानाच महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी अपेक्षित आहेत.
मात्र असे असले तरी विद्यार्थ्यांना बाजारातून वह्या पुस्तके खरेदी करणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकांना सोबत घेऊन विद्यार्थी बाजारात गर्दी करत असल्याचे चित्र आहे.परंतु वाढलेल्या किंमतीमुळे बाजारात अद्याप पाहिजे तशी खरेदीची लगबग सुरू झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
Leave a Reply