News & View

ताज्या घडामोडी

थर्मल च्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस मान्यता!

धनंजय मुंडेंच्या मागणीस अजित पवारांचा ग्रीन सिग्नल!

परळी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या परळी दौऱ्यात धनंजय मुंडे यांच्या एका महत्त्वाच्या मागणीला यश आले आहे. परळी येथील जुन्या औष्णिक विद्युत केंद्राच्या जागेत बंद असलेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत नवीन मेगा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे यासह नवीन थर्मल मध्ये प्रस्तावित संच क्रमांक ९ ची उभारणी करणे, राख प्रदूषण नियंत्रण उपाययोजना जुन्या विश्राम गृहाचे नूतनीकरण, संच क्रमांक ६ ते ८ साठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत आदी मागण्याना सकारात्मक प्रतिसाद देत अजितदादा पवार यांनी याबाबत चे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्याने मागणी केली होती, त्यानुसार या प्रस्तावाच्या अनुषंगाने आज संबंधित अधिकारी यांनी अजितदादा पवार यांच्या समक्ष सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी या सर्वच मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज औष्णिक विद्युत केंद्रातील विविध मागण्यांसह परळी वैद्यनाथ येथील श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामांचाही समग्र आढावा घेण्यात आला. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या सहमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नातून वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाच्या व परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 286.68 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिल्यात आलेली असून यातून विविध विकास कामे सुरू आहेत. या कामांना निधीची कमतरता कुठेही भासू देणार नाही मात्र अत्यंत दर्जेदार पद्धतीने व ठराविक वेळ येथे कामे पूर्ण केली जावीत असे अजित दादांनी स्पष्ट केले.

बैठकीस अजितदादांसह मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांसह संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. दरम्यान धनंजय मुंडे यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल उपुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *