माजलगाव -दारूच्या नशेत बापाने पोटच्या पोराच्या डोक्यात बांबू घालून त्याचा खून केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील खानापूर येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बीडच्या माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने लेकाची हत्या केली. बापाने लेकाच्या डोक्यात लाकडी बांबू घालून त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. रोहित गोपाळ कांबळे असे मृत तरूणाचे नाव असून गोपाळ विठ्ठल कांबळे असे आरोपी बापाचे नाव आहे.
रोहित कांबळे आणि त्याचे वडील गोपाळ कांबळे या दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारू आणण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये नेहमीच वाद होत होता. आठ दिवसांपूर्वीच रोहीत कांबळेने गळफास घेऊन आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. आज सकाळी दोघेही दारूच्या नशेत असतानाच पुन्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी गोपाळने जवळच पडलेला लाकडी बांबू रोहितच्या डोक्यात घालून त्याचा खून केला.
या घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहूल सुर्यतळ, पोलिस उपनिरीक्षक आकाश माकणे आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रोहितचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरूनच अटक केली.
Leave a Reply