बीड -ज्या काळात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी होती त्या काळात बोगस भरती करून त्या शिक्षकांचे 2012 ते 2024 या काळातील थकीत वेतन काढण्याचा प्रकार बीडमध्ये झालाय. एका एका शाळेवरील किमान दहा पेक्षा जास्त शिक्षक व कर्मचारी यांचे कोट्यावधी रुपये संस्थाचालक यांनी घशात घातले आहेत. यामुळे नोकरीवर लागलेल्या शिक्षक आणि कर्मचारी यांच्यामध्ये नाराजीचा सुर आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यात वेतन आणि भविष्य निर्वाह पथक अर्थात पे युनिट मधील अधिकारी आणि कर्मचारी देखील मालामाल झाले आहेत.
नागपूर सह विदर्भातील बोगस शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्य पातळीवरून सगळ्याच विभागात 2012 ते 2019 या दरम्यान झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या भरतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने भरती करण्यात आली. यामध्ये सर्वपक्षीय, सर्व विचारधारेच्या संस्थांचा समावेश आहे. मराठवाड्यात सर्वाधिक बोगस शिक्षक भरती ही बीड जिल्ह्यात झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष बाब म्हणजे एकीकडे नागपूर येथील भरती घोटाळ्यात अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांना अटक होतं असताना बीड जिल्ह्यात एका एका संस्थेत किमान दहा पेक्षा जास्त लोकांचे थकीत वेतन (एरियर्स )काढण्याचा उद्योग पे युनिट च्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने करण्यात आला.
बीड शहरांत असलेल्या अनेक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या नावाने एका एका शाळेने सहा ते दहा कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून घेतले आहेत.या सगळ्यासाठी ए युनिट च्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य संस्थाचालक यांना लाभले.
जिल्ह्यातील संस्थाचालकांनी हे थकीत वेतन मंजूर झालेल्या शिक्षकांकडून केवळ हे वेतन घेतले असे नाही तर अनेकांनी पुढील दोन महिन्याचे चेक देखील काही कर्मचाऱ्यांकडून घेतले आहेत. नोकरी हवी असेल तर एरियर्स द्या नाहीतर घरी जा असा ईशारा मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी याला संमती दिली असल्याची माहिती आहे.
ज्या ज्या शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना हे वेतन मिळाले त्यांची यादी आणि संस्थाचालक यांची यादी न्यूज अँड व्यूज कडे प्राप्त झाली असून लवकरच ती प्रकाशित केली जाईल आणि या सगळ्या मस्तवाल लोकांचा बुरखा फाडण्यात येईल.
Leave a Reply