News & View

ताज्या घडामोडी

बलभीम,केएसके, आदित्य मध्ये कॉप्यांचा महापूर!

बीड -पदव्युत्तर परीक्षामध्ये बीड जिल्ह्यात कॉप्यांचा महापूर सुरु असल्याचे धक्कादायक चित्र आढळून आले आहे.कुलगुरूनी केलेल्या पाहणीत बीडमधील बलभीम, केएसके आणि आदित्य महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात सामूहिक कॉपी सुरु असल्याचे आढळून आले. परीक्षा केंद्रावर असुविधा असल्याचे देखील निदर्शनास आले. या प्रकरणी कुलगुरूनी 36 विदयार्थ्यांवर कारवाई केली आहे.

बीड येथील पदवी, पदव्युत्तर परीक्षांमध्ये कॉप्यांचे प्रकार होत असल्याबाबत चर्चा होत होती. अखेर कुलगुरूंनी बीड येथील तीन केंद्रांना अचानक भेटी दिल्या. या भेटीत प्रश्‍नपत्रिकांच्या गोपनीयतेविषयी तसेच विस्कळित बैठक व्यवस्था, उशिरा पेपर देणे आदी धक्कादायक प्रकार समोर आल्याने कुलगुरूंनी संबंधितांना चांगलेच फैलावर घेतले. दरम्यान, यापुढे विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे बैठक व्यवस्था करण्याचे आदेश कुलगुरूंनी केंद्रप्रमुखांना दिले. यासह परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. भारती गवळी यांना विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्याची सूचनाही कुलगुरूंनी केली. या सर्व प्रकारांवरून पदवीच्या परीक्षा कशा झाल्या असतील, अशी शंका उपस्थित होत आहे.


पदव्युत्तर परीक्षा सुरू झाल्यावर कुलगुरू डॉ. विजय फुलारी हे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास आदित्य व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात पोहचले. तिथे उशीरा पेपर देण्यात आले होते. यासह बैठक क्रमांकही व्यवस्थित टाकलेले नव्हते. केंद्रप्रमुखही याठिकाणी उशीरा पोचले. यासह प्रश्‍नपत्रिका डाऊनलोड करण्याचे आणि प्रिंट करण्याच्या गोपनीयतेत कसूर असल्याचे दिसून आले. या केंद्रावर सहा विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले.

साडेअकराच्या सुमारास कुलगुरूंसह भरारी पथकातील डॉ. सतीश दांडगे, डॉ. भास्कर साठे हे केएसके महाविद्यालयात पोचले. तिथे प्रश्‍नपत्रिका एका इमारतीत, तर प्रिंट दुसऱ्या इमारतीत करण्यात येत होती. त्याठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नव्हते. तर, १५ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले.

बारा च्या सुमारास कुलगुरूंचे भरारी पथक बलभीम महाविद्यालयात पोचले. तिथे अर्धी गोणी कॉप्या पथकाने जमा केल्या. तर, १५ कॉपीबहाद्दरांना पकडले. दरम्यान, या केंद्रावरही सुविधा आणि सुरक्षितेशी तडजोड केली असल्याचे दिसून आल्याने कुलगुरूंनी केंद्रप्रमुखांना चांगलेच सुनावले.


गोपनीयतेला हरताळ
स्ट्राँग रूममध्ये सीसीटीव्ही, झेरॉक्स मशीन नसल्याचे दिसून आले. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी संबंधित केंद्रप्रमुखाला विचारणा केली. या भेटीच्या वेळेपर्यंत केएसके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर तसेच सहकेंद्र प्रमुख हे महाविद्यालयात हजर नव्हते. बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष उंदरे, केंद्रप्रमुख आणि सहकेंद्रप्रमुख हे उपस्थित होते तर आदित्य व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयांचे संपूर्ण केंद्रच विस्कळित होते, असे निरीक्षण पथकाने नोंदविले.


परीक्षा केंद्रात अनेक त्रुटी
कॉपी करताना पकडण्यात आलेल्या तीन केंद्रांत १ हजार तीन विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका घेण्यात आली. तसेच, कॉपी करणाऱ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेशही कुलगुरूंनी दिले. या तीनही परीक्षा केंद्रांवर विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे बैठक व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *