बीड -नागपूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बोगस शिक्षक भरती घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा बीडमध्ये देखील झाला आहे. शिक्षण प्रसारक संस्था असो कि शिक्षण प्रसारक मंडळ अशा सर्वच ठिकाणी नाना, मामा, अण्णा, भाऊ, दादा यांच्यासारख्या अनेकांनी मोठा डल्ला मारला आहे. याला शिक्षणाधिकारी यांच्यासहित छत्रपती संभाजीनगर येथील उपसंचालक देखील जबाबदार असल्याची चर्चा आहे. बीडच्या घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत झाल्यास अनेक संस्थाचालकांचा बुरखा फाटणार आहे.
2012 ते 2019 या काळात राज्य सरकारकडून शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या भरतीवर बंदी होती. मात्र याच काळात नागपूर जिल्ह्यात जवळपास 570 बोगस शिक्षकांची भरती झाली. याबाबत माजी आ ना गो गाणार यांनी आवाज उठवल्यानंतर आतापर्यंत तीन अधिकाऱ्यांना अटक झाली आहे.
नागपूर मध्ये ज्याप्रमाणे बोगस शिक्षक भरती करण्यात आली. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या संस्थाचालकांनी किमान एक हजार पेक्षा जास्तच शिक्षकांची आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती केली आहे.
अगोदर विनाअनुदानित शाळेवर भरती करायची, ही भरती करताना बॅकडेट मध्ये भरती दाखवायची, त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक असो कि माध्यमिक यांच्याकडे संचमान्यते साठी प्रस्ताव पाठवायचा. तिथं एका उमेदवारासाठी किमान पाच ते दहा लाख मोजायचे अन त्यानंतर शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मान्यता घ्यायची असा हा धंदा सुरु आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो कि इतर सामाजिक संस्था यांच्या नावावर सुरु असलेल्या शिक्षण प्रसारक संस्था आणि शिक्षण प्रसारक मंडळ या नावाखाली उभारलेल्या पैसे कमवण्याच्या कारखान्यातून हा गोरख धंदा बिनबोभाटपणे सुरु आहे.
बीडसह मराठवाड्यात शिक्षण संस्थांचे जाळे असलेल्या या संस्था चालकांनी आपला मुलगा, मुलगी, बहीण, भाऊ, बायको, पुतण्या, पुतणी, भाचा, भाची यांच्यासहित असंख्य नातेवाईकांना नोकरी दिली आहे.हे सगळं करताना आपला लाखो नव्हे तर कोट्यावधी रुपयांचा फायदा कसा होईल याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आहे.
बीड जिल्ह्यात कोणत्याही पक्षाचा नेता असो त्याच्या शाळेतील बोगस काम करण्याचा विडा एक खास व्यक्ती उचलतो अशी चर्चा आहे. कधी कार्यवाह तर कधी सहकार्यवाह तर कधी शिक्षक म्हणून काम करणाऱ्या या नाना ने अनेकांना पोटापाण्याला लावले आहे. हे करताना त्याने आपली देखील सात पिढ्याची सोय करून ठेवली आहे.
केवळ नाना च नव्हे तर अण्णा, भाऊ, दादा, साहेब, ताई, अशी बिरुद मिरवणाऱ्या तथाकथित संस्थाचालक अन राजकारणी मंडळींनी देखील आपले उखळ पांढरे करून घेतले आहे.
या सगळ्या काळ्या कारणांम्यांना कागदोपत्री नियमात दाखवण्याचे काम 2012 ते 2025 या काळात नोकरीत असलेल्या त्या त्या शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांनी केले आहे.
या सगळ्या बोगस शिक्षक भरतीला वेतन निश्चिती पथकाचे तत्कालीन अधीक्षक देखील तेवढेच जबाबदार आहेत. एका शिक्षकाचे बिल काढण्यासाठी या कार्यालयात किमान लाख रुपयापासून ते दहा लाख रुपयापर्यंत रेट काढलेला आहे.
विशेष बाब म्हणजे काही प्रकरणे या नाना, अण्णा, भाऊ, दादांनी उच्च न्यायालयात पाठवून तिथून देखील न्यायालयाची दिशाभूल करून आपले काळे धंदे सुरु ठेवले आहेत अशी माहिती आहे.
नागपूर प्रमाणे बीड जिल्ह्यात झालेल्या या घोटाळ्याची चौकशी होऊन या धंदेवाईक लोकांना शिक्षा होणे आवश्यक आहे अशी मागणी होतं आहे.
Leave a Reply