News & View

ताज्या घडामोडी

नारायणगड हे भगवानगडाचे गुरुघर -महंत नामदेवशास्त्री!

बीड -नारायणगड हे भगवानगडाचे गुरुघर आहे. 90 वर्षांपूर्वी भगवान बाबांनी नारळी साप्ताहची सुरवात केली. आज पिंपळनेर येथे 91 वा सप्ताह होतो आहे याचा आनंद आहे. भगवान बाबा वामनभाऊ यांनी डोंगरातील माणसांना माळ घालून माणसात आणलं आज काहीजण माळकऱ्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे सांगत महंत नामदेव शास्त्री यांनी नारळी सप्ताहाचा प्रारंभ केला.

शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर जायभाय येथे भगवान गडाच्या 91 व्या नारळी सप्ताहाचा प्रारंभ झाला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास महंत नामदेवशास्त्री यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान फुल टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना महंत नामदेवशास्त्री यांनी नारळी साप्ताहची परंपरा विषद केली.

भगवान बाबा हे काहींवर्षे नारायणगड येथे होते. त्यांनी भगवान गडाची निर्मिती केल्यानंतर पहिला नारळी सप्ताह पखालडोह या गावात सुरु केला. नारळी सप्ताह करण्यासाठी अवसान लागत. दानत लागते. अवसानघातकी माणसं हा सप्ताह करू शकत नाहीत.

हा सप्ताह अगोदर घाटशिळ पारगाव या गावात होणार होता. मात्र काही आठ दिवसापूर्वी पिंपळनेर ग्रामस्थांनी मागणी केली आणि अवघ्या आठ दिवसात ही भव्यदिव्य तयारी केली. सात दिवसात वेगवेगळ्या कीर्तनकारांची सेवा येथे होणार आहे.

डोंगर दऱ्यात राहणाऱ्या माणसांना माळ घालून माणसात आणण्याचं काम बाबा आणि भाऊंनी केलं. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर आज आम्ही वाटचाल करत आहोत. भगवानगडावर ज्ञानेश्वर माऊलींचे पंचवीस तीस कोटी रुपये खर्चून मंदिर बांधण्यात येतं आहे. हे मंदिर ऊसतोड कामगार आणि मजुरांच्या घामाच्या पैशातून उभारले जातं आहे. पुढील वर्षी त्याचा कलषारोहन समारंभ साजरा केला जाणार आहे.

नारळी सप्ताहमध्ये प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून धर्म कार्यात सहभागी व्हावे असेही महंत म्हणाले. कोणताही धर्म हा दानावर मोठा होतो. इस्लाम मध्ये देखील जकात दिली जाते. तसेच आपल्यात देखील संसार करताना थोडा परमार्थ करावा असा सांगितलेले आहे. त्यामुळेच असे मोठमोठे सप्ताह सहज साजरे होतात.

हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत या नारळी सप्ताहची सुरवात झाली. या ठिकाणी फुल वाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर हजारो भाविक भक्तांनी प्रसाद ग्रहण केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *