बीड -संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपण निर्दोष आहोत, माझा या प्रकारणांशी काहीही संबंध नाही असा अर्ज आरोपी वाल्मिक कराड याने केला आहे. यावर्षी पुढील सुनावणीत सीआयडी ने आपले म्हणणे मांडावे असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
सुनावणी पार पडल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आरोपी क्रमांक एक वाल्मिक कराडने कोर्टाकडे खटल्याशी संबंधित कागदपत्रांची मागणाी केली होती. ती सगळी कागदपत्रं सीआयडीमार्फत न्यायालयात सादर करण्यात आली. मात्र काही दस्तवेज सीलबंद असल्यामुळे ते सील उघडल्यानंतरच त्याच्या प्रती देण्यात याव्यात अशी विनंती कोर्टाला करण्यात आली.
अॅड. निकम पुढे म्हणाले की, वाल्मिक कराडने एक अर्ज दाखल केला असून स्वतः निर्दोष म्हटलं आहे. ”या खटल्यातून मला मुक्त करावे, कारण माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही, खून किंवा खंडणीमध्ये मी नाही.” असा अर्ज कराडने कोर्टात दाखल केल्याचे उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.
त्यावर कोर्टाने सीआयडीला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. येत्या २४ तारखेला हे म्हणणं न्यायालयात सादर केलं जाणार आहे. त्यावर सुनावणी होईल, वाल्मिकच्या बाजूने आणि सरकारच्या बाजूने युक्तिवाद होतील, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.
उज्ज्व निकम म्हणाले की, खून आणि खंडणीच्या प्रकरणात आपला संबंध नाही, हे दाखवण्याचा वाल्मिकचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. त्यावर २४ तारखेला सीआयडी आपलं म्हणणं मांडेल आणि त्यावर सविस्तर युक्तिवाद होईल. मकोका कायद्यांतर्गत सर्व आरोपींची संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ज दाखल केल्याचंही त्यांनी सांगितलं.
Leave a Reply