बीड -संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना बीडच्या कारागृहात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
सरपंच हत्या प्रकरणात अटक असलेल्या परळीमधील आरोपींमध्ये हा वाद झाल्याची जेल प्रशासनाने पुष्टी केली आहे. दोन गटांमध्ये हा वाद झाला आहे. कोणते दोन गट आहेत? अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. याच कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व सुदर्शन घुले याच्यासह इतर आरोपीही आहेत. तर बबन गिते गँगमधील महादेव गिते याने मारहाण केल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
जेलमध्ये सकाळी झालेल्या वादाच्या घटनेत वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले याला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदर्शन घुले याला मारहाण करण्यात आली तर वाल्मीक कराड यालाही चापटी लगावल्याची चर्चा आहे. परळी येथील महादेव गीते, अक्षय आठवले याच्याकडून मारहाण झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर जेलमध्ये मारहाण झालेल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सकाळी नऊच्या दरम्यान हा प्रकार झाल्याची कारागृह प्रशासनाने माहिती दिली आहे. फोन करण्यासाठी बाहेर बराक मधून आल्यानंतर हा सगळा प्रकार घडला. पाच नंबर बऱ्याक आणि सहा नंबर बरेकमधील आरोपीमध्ये हा सगळा प्रकार घडला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, जेल प्रशासन या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.
Leave a Reply