News & View

ताज्या घडामोडी

देशमुख मर्डर खटला बीडला वर्ग!

बीड -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला केज वरून बीडला वर्ग करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड आणि इतरांवर बीडच्या मकोका न्यायालयात हा खटला सुरु राहील. सुरक्षेच्या कारणास्तव हा खटला केजवरून बीडला वर्ग करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी न्यूज अँड व्यूज ला दिली.

मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे यांच्यासह इतरांवर मकोका, खून, खंडणी आणि ऍट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील कृष्णा आंधळे वगळता इतर आरोपी अटक आहेत. या प्रकरणाची पहिली सुनावणी केजच्या न्यायालयात पार पडली. यात पुढील सुनावणी 26 मार्च रोजी होणार आहे. Newsandview सरकारी पक्षाच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम आणि ऍड बाळासाहेब कोल्हे यांची या प्रकरणी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान हा खटला केज वरून बीडला वर्ग करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आरोपी वाल्मिक कराड आणि इतर हे संघटित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. तसेच केज, धारूर, परळी या भागात त्यांची दहशत आहे. त्यामुळे खटला केज येथे सुरु राहिल्यास साक्षीदार आणि इतरांवर दबाव निर्माण होऊ शकतो.

या कारणामुळे हा खटला बीडच्या मकोका न्यायालयात चालवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. यावर बीडच्या न्यायाधीश आनंद यावलकर यांच्यासमोर सुनावणी झाली.त्यावेळी हा खटला केज येथून बीडच्या मकोका न्यायालयात वर्ग करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *