News & View

ताज्या घडामोडी

आयुष्यमान च्या अध्यक्षपदी डॉ ओमप्रकाश शेटे!

बीड – बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा गोरगरिबांचे देवदूत म्हणून परिचित असलेल्या डॉ.ओमप्रकाश शेटे यांना पदोन्नती मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांची निवड व कार्यकक्षा याबाबत सरकारच्या वतीने शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे. सरकारकडून झालेला हा सन्मान त्यांच्या कष्टाचे व परिश्रमाचे मूल्य अधोरेखित करणारा आहे. डॉ. शेटे यांच्याकडे आरोग्य क्षेत्रातील महत्वपूर्ण जबाबदारी आल्यामुळे सर्वसामान्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून डॉ.ओमप्रकाश शेटे सबंध महाराष्ट्राला परिचित आहेत. फडणवीस यापूर्वी मुख्यमंत्री असताना डॉ. शेटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून केलेले काम उल्लेखनीयच नाही तर ऐतिहासिक आहे. तत्कालीन सरकारमध्ये फडणवीस यांचा ‘सातवा माळा’ गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्य मंदिर बनला होता. त्या मंदिरातील पुजारी म्हणून शेटे यांनी केलेली रुग्ण सेवा अभूतपूर्व होती, याला महाराष्ट्र साक्षी आहे. त्यावेळी लाखो लोकांना योजनेचा लाभ देत मुख्यमंत्री सहायता निधीतून 600 कोटी व धर्मादाय कोट्यातून एक हजार दोनशे कोटींचे उपचार करण्याचा विक्रम करण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये गरीब रुग्णांना उपचारासाठी मदत मिळणे दुरापास्त झाले होते.
राज्यामध्ये परत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या खास विश्वासू शिलेदारांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे निकटवर्तीय असलेल्या डॉ.ओमप्रकाश शेटे यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने फडणवीस यांच्या मान्यतेने प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रिकरण करुन पाच लाख रुपयांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत नेण्याची जबाबदारी डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्यावर सोपवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना म्हणून परिचित असलेल्या आयुष्मान भारत योजनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी डॉ. ओमप्रकाश शेटे यांची निवड करण्याचा महत्वपूर्ण निर्णय फडणवीसांनी घेतला आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.


🔸 डॉ.ओमप्रकाश शेटे सक्षम पर्याय

विधान परिषदेच्या सभागृहात अधिवेशनामध्ये सत्ताधारी व विरोधक यांनी लक्षवेधी लावत आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना यातील त्रुटीवर प्रचंड टीका केली होती. या योजनेतील त्रुटीमुळे सामान्य माणसांना पाच लाख रुपयाचा लाभ मिळत नाही असा आरोप सर्वांनी केला होता. कदाचित या योजनेला शेवटच्या घटकापर्यंत देण्याकरिता व झारीतले शुक्राचार्य बाजूला करण्याकरिता डॉ.ओमप्रकाश शेटे सारखा अनुभवी व सक्षम पर्याय म्हणून फडणवीस यांनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली असल्याचे समजते.


🔸रुग्ण व रुग्णालये दोन्ही वाचली पाहिजेत..!

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अशी एकत्रित असलेल्या आयुष्मान योजनेमध्ये राज्यातील 1800 पेक्षा जास्त रुग्णालये अंगीकृत आहेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या हॉस्पिटलवर चाप बसण्याची गरज आहे. रुग्ण आणि रुग्णालये दोन्ही वाचली पाहिजेत यासाठी डॉ. ओमप्रकाश शेटे कसा सुवर्णमध्य साधतात? हे पहावे लागेल. जबाबदारी सोबतच मिळालेल्या अधिकारांचा वापर करून डॉ. शेटे हे सामान्य रुग्ण व रुग्णालये या दोघांमध्ये योग्य समन्वय साधतील यात शंका नाही. यासाठी यापूर्वीचा दांडगा अनुभव त्यांच्या कामी येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *