बीड- राज्यात यंदा मान्सून चे आगमन उशिरा होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.एकीकडे अंगाची लाही लाही करणारे प्रचंड ऊन अन दुसरीकडे लांबणारा पाऊसकाळ यामुळे जनता बेजार झाली आहे.अशात जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.राज्यातील धरणात केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने 15 जुननंतर पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यातील एकूण दोन हजार ९९३ प्रकल्पांमध्ये सुमारे ४३४.२७ टीएमसी (१२,३०० दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच सरासरी ३०.५३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात एक टक्क्याने घट झाली असल्याची स्थिती आहे.
राज्यात गेल्या दोन वर्षांपूर्वी पाण्याची मोठी टंचाई भासली होती. त्यामुळे पाण्यासाठी शासनाला अनेक ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. गेल्या वर्षी उशिराने पाऊस चांगला झाल्यामुळे राज्यातील प्रकल्पांमध्ये चांगले पाणी आले होते.
तसेच भूजल पातळीत वाढ होऊन विहिरींना आणि बोअरवेलला पाणी आले. मात्र काही भागांत पाण्याचा अतिउपसा होत असल्यामुळे फेब्रुवारीपासून अनेक गावामध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तर काही गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी पाण्याची काही प्रमाणात मागणी वाढली होती. त्यामुळे धरणातील पाणीपातळी कमी झाली होती. गेल्या वर्षी याच काळात राज्यातील प्रकल्पामध्ये अवघा ३१.६३ टक्के एवढा पाणीसाठा होता. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते.
कोकण विभागात ४०.५१ टक्के, नागपूर विभागात २९.६७ टक्के, अमरावती विभागात ३७.८५ टक्के, नाशिक विभागात २६.१६ टक्के, तर पुणे विभागात २३.६२ टक्के पाणीसाठा होता. तर सर्वाधिक पाणीटंचाई भासत असलेल्या औरंगाबाद विभागातील प्रकल्पामध्ये २९.६७ टक्के पाणीसाठा होता.
सध्या मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्पामध्ये सर्वाधिक पाणीसाठा ठाणे विभागात झाला आहे. ठाणे विभागात ४३.८३ टीएमसी म्हणजेच ३५.२३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
अमरावती विभागात ५३.८२ टीएमसी म्हणजेच ४०.४९ टक्के, नागपूर विभागात ६५.३३ टीएमसी म्हणजेच ४०.१७ टक्के, नाशिक विभागात ६८.७२ टीएमसी म्हणजेच ३२.८२ टक्के, पुणे विभागात ११४.९६ टीएमसी म्हणजेच २१.४२ टक्के, तर औरंगाबाद विभागात ८७.५८ टीएमसी म्हणजेच ३४.१५ टक्के पाणीसाठा आहे.
Leave a Reply