बीड -आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या करून चोवीस तास उलटून गेले तरी गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांची जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी चांगलीच शाळा घेतली. एका व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतरही गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेत जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
बीड शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या आवारात धनंजय नागरगोजे या शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील शिक्षकाने फेसबुक वर पोस्ट लिहून आपल्याला संस्थाचालक विक्रम मुंडे, विजयकांत मुंडे, अतुल मुंडे यांनी अठरा वर्षांपासून पगार न दिल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते.
सोशल मीडियावर पोस्ट लिहून आत्महत्या करणाऱ्या शिक्षकांच्या प्रकरणात पोलिसांनी कोणताच गुन्हा दाखल केला नाही. तक्रारदार नसल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.
याबाबत बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी माहिती घेऊन तातडीने पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत देखील पोलिसांनी तक्रार नसल्याचे कारण सांगितलं. तेव्हा पाठक यांनी अधिकाऱ्यांना झापझाप झापलं.
किमान वेतन कायदा डावलल्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करा तसेच संबंधित संस्थाचालक यांच्याविरुद्ध देखील आत्महत्येस जबाबदार असल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
विशेष बाब म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी न झाल्याने समाज कल्याण अधिकारी यांना फिर्याद देण्यास सांगत त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाठवले आहे.
एरवी सोशल मीडियावर शस्त्र बाळगल्याचे फोटो टाकल्या प्रकरणी स्वतःहून गुन्हा दाखल करणारे पोलीस या प्रकरणात मात्र मूग गिळून का गप्प बसले. दुसऱ्यांना कायदा शिकवणारे पोलीस अधीक्षक या प्रकरणात का शांत बसले असे सवाल उपस्थित होतं आहेत.
Leave a Reply