News & View

ताज्या घडामोडी

नागरगोजे आत्महत्या प्रकरणी गुन्हाच दाखल नाही!

बीड – बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे यांच्या संस्थेतील शिक्षक धनंजय नागरगोजे याने संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. मात्र चोवीस तास उलटले तरीही या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. कोणाची तक्रार नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आळा नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशि चर्चा केली आहे.

धुळवडीच्या दिवशी एका शिक्षकाने बँकेच्या बाहेर फाशी घेऊन, स्वत:ला संपवलं. धनंजय अभिमान नागरगोजे या 30 वर्षीय शिक्षकाने स्वत:चं आयुष्य संपवताना लिहिलेल्या पोस्टमध्ये आरोपींच्या नावाचाही उल्लेख केला आहे. विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हालहाल करून मारणार आहेत, असे त्यांनी म्हटले. आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्येप्रकरणी सहाही जणांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, आज पुन्हा एकदा डोकं सुन्न झालं. धनंजय नागरगोजे काहीच न विचार करता गेले? ३ वर्षाच्या त्यांच्या चिमुकलीला सोडून. किती निर्दयी आहेत ही माणसं… हे… विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे, गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड, थर्ड ग्रेड माणस आहेत ही. 18 वर्ष पगार दिला नाही आणि पगार मागितला म्हणून हाल केले? पण हे एकटेच कारणीभूत आहेत का? शासन काय करतंय? मी त्यांचे फेसबुक पाहिले. 8 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023 ला आझाद मैदानात आंदोलन केले. उपयोग काय झाला? सगळ्यात depressing जागा आहे ती. असंख्य लोक येतात आंदोलनात सहभागी होतात, नारे देतात, आक्रोश करतात आणि आल्या पावली परत जातात. मग आज धनंजय नागरगोजेने प्राण दिला ह्याला सरकार जबाबदार नाही का? सामान्य माणसाने कसं लढायचं? ऐका त्यांची व्यथा, असे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत दमानिया यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी चर्चा केली मात्र कोणीच तक्रार करत नसल्याने गुन्हा दाखल झालेला नाही असे त्यांनी सांगितलं. आपण पुन्हा उद्या त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *