बीड -दिलीप ढाकणे व त्यांच्या मुलाला मारहाण करून फरार झालेल्या खोक्या भोसलेने नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करत ट्रॅव्हल्स ने थेट प्रयागराज गाठले. या ठिकाणी आठ दिवस मुक्काम करण्याच्या हिशोबाने तो गेला होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केल्याने त्याचा प्लॅन फसला.
तेथे लपण्याआधीच बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर आता खोक्या भोसलेचा बीड पोलिसांनी ताबा घेतला आहे. बीड वरून गेलेल्या पोलीस पथकाने खोक्या भोसलेचा ताबा घेतला. प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून ताबा घेतला .
गुरुवारी खोक्या भोसलेला बीडसाठी आणले जाणार आहे. मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगर विमानतळावर खोक्या भोसलेला आणले जाणार आहे. दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगर विमानतळावरही आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज सायंकाळपर्यंत खोक्या भोसले बीड जिल्ह्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे.
पुणे, अहिल्यानगरमध्ये मुक्काम
घटनेचा व्हिडीओ सतीश ऊर्फ खोक्या भोसलेने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर त्याने अहिल्यानगर गाठलं. तेथून पुणे आणि मग छत्रपती संभाजीनगरला गेला होता. मंगळवारी दुपारी 12 वाजता खोक्या ट्रॅव्हल्सने प्रयागराजला गेला. तेथे उतरून लपण्याच्या तयारीत असतानाच यूपी पोलिसांनी त्याला पकडले.
खोक्या भोसलेच्या मारहाणीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर तो फरार झाला होता. गळ्यात सोने, पैशाची उधळण, व्हीआयपी वाहने, हेलिकॉप्टरमधून फिरतानाचे खोक्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते; परंतु गुन्हा दाखल होताच खोक्याने अंगावरचं सगळं सोनं काढलं. तो प्रयागराजला पोहोचला. सोबत पाठीवर एक पिशवी होती. त्याचबरोबर तो आठवडाभर तेथेच थांबण्याची तयारीत होता अशी माहिती आहे.
खोक्याने 10 मार्च रोजी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या न्यायालयात अर्ज केला होता. त्याची सुनावणी बुधवारी होणार होती; परंतु मागावरील बीड पोलिसांनी त्याआधीच बेड्या ठोकल्या.
बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरूरकासार तालुक्यातील बावी येथे आणून पाच ते सहा जणांनी अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या बाप-लेकाला मारहाण केल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर वन विभागाने खोक्याच्या घरी छापा टाकून तपासणी केली. यात वाळलेले मांस आणि शिकारीचे साहित्य जप्त केले. या सर्व गुन्ह्यांमध्ये खोक्या हा पोलिसांना हवा होता; परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर या खोक्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.
Leave a Reply