मुंबई -दादा, तुम्ही बीडचे पालकमंत्री आहात त्यामुळे येत्या पाच वर्षात बारामती प्रमाणे बीडचा विकास होईल असा विश्वास आम्हाला आहे असे बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी म्हणताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसून त्यांना प्रतिसाद दिला. विधानसभेत आ क्षीरसागर यांनी बीडच्या विकास प्रश्नावर सरकारकडे विविध मागण्या केल्या.
ना.अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे पाच वर्षांमध्ये बीड जिल्ह्याचा विकास बारामतीसारखा होईल. अशी अपेक्षा संपूर्ण जिल्ह्यावासीयांकडून आ.संदीप क्षीरसागरांनी व्यक्त केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघाच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेले विविध प्रश्न सभागृहात मांडले.
मुंबई येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात आ.संदीप क्षीरसागर यांनी बुधवारी (दि.१२) रोजी बीड मतदारसंघाच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेले विविध प्रश्न व कामे सभागृहात मांडली. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यावेळेस ना.अजित दादा पवार आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याला ना.अजितदादांकडून अपेक्षा आहेत.
ना.अजितदादांच्या पुढाकारातून येत्या पाच वर्षांत बीड जिल्ह्याचा विकास बारामतीसारखा होईल अशी लोकभावना जिल्हावासीयांची आहे. अशा शब्दांत आ.क्षीरसागरांनी ना.अजितदादांकडे जिल्ह्याच्या विकासाबाबत अपेक्षा व्यक्त केली.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी हद्दपार करायची असेल तर, तरूणांना रोजगार देऊन गुन्हेगारी पासून परावृत्त करावे लागेल. त्यासाठी बीड येथे असलेल्या एमआयडीसीचा विकास होणे गरजेचे आहे. याबाबत आ.संदीप क्षीरसागरांचा ना.अजित पवारांकडे पाठपुरावा सुरू आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच बीड एमआयडीसीचा प्रस्ताव घेऊन आ.संदीप क्षीरसागर ना.अजितदादांना भेटले होते. त्यावर ना.अजितदादांनी विभागाला निर्देश दिले होते. त्यानंतर बीड येथे उपलब्ध असलेल्या २५० एकर जागेचा सर्वे काही दिवसांपूर्वीच झाला आहे. औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी येथे उपलब्ध आहेत. तसेच मोठ्या उद्योजकांनाही भेटलो असून त्यांनीही याठिकाणी उद्योग उभारण्यासाठी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे बीड एमआयडीसीच्या विकासासाठी निधी देऊन बळ द्यावे अशी मागणी आ.संदीप क्षीरसागरांनी केली. यासोबतच बीड शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बाब म्हणून नगरपालिकेकडील वीजबिल भरण्यासाठी निधीची तरतूद करावी त्यामुळे या उन्हाळ्यात खूप मोठा दिलासा बीड शहरातील नागरिकांना मिळेल.
टुकूर साठवण तलाव प्रकल्पात सन २००३ मध्येच कार्यारंभ आदेश मिळालेले आहेत परंतु याला असलेल्या स्थानिकांच्या विरोध असल्यामुळे हे काम होऊ शकले नाही. त्यावर मार्ग काढून एकाच ठिकाणी साठवण तलाव करण्याऐवजी चार विविध ठिकाणी बंधारे केल्यास तलावाइतक्याच क्षमतेने पाणी साठवणूक होईल. आणि हे सर्व तलाव प्रकल्पाला लागणार्या रकमेच्या अर्ध्याच रकमेत होणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पाला निधी द्यावा. तसेच शिरूर कासार तालुक्यातील फुलसांगवी येथील २.८३ द.ल.घ.मी. क्षमतेचा साठवण तलाव आहे. परंतु पावसाळ्यातील बदलामुळे तलाव भरण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे येथीलच सिंदफणा नदीवर मोठ्या क्षमतेचा बंधारा तयार केल्यास किंवा इतर पर्यायी उपयुक्त मार्गाचा अवलंब करून उपसा जलसिंचन किंवा कॅनॉलद्वारे पाणी तलावात सोडल्यास तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग निघेल.
परिणामी परिसरातील अनेक गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटेल. त्यामुळे या कामाकरिता निधी देण्यात यावा. त्यासोबतच बीड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळ्याची उभारणी करणे, स्व.अण्णासाहेब पाटील व स्व.विनायकराव मेटे यांचा पुतळा पंचायत समिती आवारात बसविणे आदी कामांना निधी देण्यात यावा अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात केली. बीड मतदारसंघाच्या विकासासाठी अतिमहत्वाच्या असलेल्या विविध प्रस्तावित कामांना निधी आणि मंजुरी देण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.
Leave a Reply