मुंबई -राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी देखील वाचली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यांनंतर कोकाटे यांना विरोधीपक्षाने लक्ष्य केले होते.
मस्साजोग प्रकरणावरून चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी काल (दि.4) त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज सर्वांच्या नजरा कोकाटेंना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर काय निकाल येतो याकडे लागल्या होत्या. पण आता न्यायालयाने कोकाटेंना सुनवण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने अजितदादांच्या आणखी एका मंत्र्याची विकेट पडता पडता वाचली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आजच्या निकालावर कोकाटे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून होते त्यामुळे सर्वांच्याच नजरा याकडे लागल्या होत्या. शिक्षेला स्थगिती मिळाल्याने कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
दोन वर्षांची सुनावण्यात आली होती शिक्षा
1995 साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केल्याप्रकरणी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 50 हजारांच्या दंडासह दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाने सरकारी वकील आणि कोकाटेंच्या वकिलांची बाजू ऐकून घेत या शिक्षेला स्थगिती देत निकाल राखून ठेवत 1 मार्च ही तारीख दिली होती. मात्र, त्यानंतर या प्रकरणावर निकाल देण्यासाठी 5 मार्चची तारीख दिली होती. त्यावर आज निकाल देण्यात आला आहे.
1995 ते 1997 सालचं हे प्रकरण असून, कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री तुकाराम दिघोळेयांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की, आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. 1995 साली कोकाटे हे आमदार होते तर, दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू होता.
राजकीय वैऱ्यापोटी माझ्या केस केली
नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले होते की, ही राजकीय केस होती. तुकाराम दिघोळे हे त्यावेळेस राज्यमंत्री होते. त्यांचं आणि माझं वैर होते त्या वैरापोटी त्यांनी माझ्यावर केस केली होती. त्याचा निकाल (दि.20) तीस वर्षानंतर लागल्याचे कोकाटेंनी म्हटले होते.
Leave a Reply