मुंबई – स्प्रे पंप, सोलर लाईट ट्रॅप इत्यादी वस्तू खरेदी करण्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी पत्र देऊन जीआर काढायला लावला, मंत्रिमंडळ बैठकीत त्याआधी कोणताही निर्णय झाला नव्हता, अंजली दमानिया यांनी केलेला हा दावा संपूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे. अंजली दमानिया ह्या सुरुवातीपासून अर्धवट ज्ञानाच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे चुकीचे व खोटे आरोप करून मीडिया ट्रायल चालवत आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले असून अंजली दमानिया यांच्या आरोपांचे त्यांनी खंडन केले आहे.
श्रीमती सुजाता सैनिक, मुख्य सचिव तथा मंत्रिमंडळ सचिव यांनी दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांची मान्यता झाल्यानंतर दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीचे इतिवृत्त निर्गमित केलेले आहे. त्यामध्ये कृषी विभागाच्या खरेदी व थेट पुरवठ्याला मान्यता देण्यात आलेली आहे. याबाबतची खरी कागदपत्रे आता समोर आली आहेत.
ज्याला अंजली दमानिया बिना तारखेचे सही केलेले पत्र म्हणतात ते वास्तविकत: मंत्री कृषी यांनी आपल्या विभागाच्या सचिवांना निर्गमित केलेले टिपण आहे. टिपणावर दिनांक टाकण्याचा प्रघात नाही, तथापि सदर टिपणावर ते ज्याला मार्क केलेले आहे, त्याची स्वाक्षरी व त्याला प्राप्त झाल्याचा व कार्यासनात प्राप्त झाल्याचा दिनांक नमूद असतो. हा कार्यालयीन प्रक्रियेचा भाग आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शासन निर्णयान्वये व मंत्रिमंडळ निर्णयान्वये मान्यता प्राप्त झालेली खरेदी अद्यापही झालेली नाही. त्याची प्रक्रिया सुरू आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही तातडीने करण्यासंदर्भात विभागाला टिपणाद्वारे अथवा इतर प्रकारे निर्देश देण्याचे अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 166 खाली बनविण्यात आलेल्या कार्य नियमावलीतील तरतुदीनुसार संबंधित मंत्र्यांना आहेत.
दमानिया ताई यांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे जे खोटे आरोप केलेले आहेत ते संपूर्णतः खोटे आहेत, फक्त मीडिया ट्रायल करून माझी बदनामी करण्यासाठी आहेत, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
या संदर्भात आम्ही खोटी कागदपत्रे तयार केल्याची त्यांना खात्री असेल तर त्या प्रकारची रीतसर तक्रार त्यांना योग्य त्या मंचावर, प्राधिकरणाकडे नोंदविण्याची मुभा आहे, पण त्या तसे करणार नाहीत, कारण त्यांना फक्त बदनामी करायची आहे.
यासंदर्भात त्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या बदनामीकारक बाबींबद्दल त्यांचे विरुद्ध फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही मुंडेंनी स्पष्ट केले आहे.
सोबत मंत्रिमंडळ बैठकीत झालेले याबाबतचे निर्णय याचे कागदपत्र जोडले आहेत. यातील आपल्या सोयीचे कागदपत्र स्वतः अंजलीताई दमानिया यांनीही माध्यमाना गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत, ती कागदपत्र तपासली तरीही 23 सप्टेंबर 2024 रोजीच्या बैठकीत हा निर्णय झाला होता हे लक्षात येईल. मात्र त्यांचे खोटे बोल पण रेटून बोल हेच धोरण सुरू आहे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
Leave a Reply