मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपचे आ सुरेश धस यांची भेट झाल्याने खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येंनंतर धस यांनी मुंडे यांना टार्गेट केले होते, त्यानंतर ही भेट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे.
या दोन नेत्या मध्ये गुप्त बैठक झाल्याचे समोर आले आहे. या भेटीवर भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील शिक्कामोर्तब केले आहे. याच भेटीवर आता खुद्द सुरेश धस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील गुन्हेगारांना फाशी मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
सुरेश धस यांनी नेमकं काय सांगितलं?
सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त बैठक झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच गजहब उडाला आहे. त्यानंतर आता सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “धनंजय मुंडे याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्या दिवशी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी लपून छपून नव्हे तर दिवसा मी त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेलो होतो. प्रकृतीच विचारपूस आणि लढा या दोन वेगळ्या बाबी आहेत,” असं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलं.
प्रकृतीची चौकशी करणे यात गैर काय आहे?
लढ्यामध्ये आम्ही धनंजय मुंडे यांच्या विरोधातच राहणार आहोत. मी धनंजय मुंडे यांना भेटायला गेलो तेव्हा फक्त प्रकृतीची चौकशी केली. प्रकृतीची चौकशी करणे यात गैर काय आहे? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील लढा आणि प्रकृतीची चौकशी करायला जाणे यात काहीही संबंध नाही. हा संबंध कृपया जोडू नये. आमच्यात कोणीही मध्यस्थी केलेली नाही, असेही धस यांनी सांगितले.
मी धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप मागितलेला नाही
आमच्यात साडे चार तास भेट झालेली नाही. आमच्यात भेट झाल्यानंतर बाहेर येऊन मी काय केले, हे तुम्हीच पाहून घ्या. पुढच्या काही दिवसांत मी आणखी काही सांगणार आहे, ते तुम्हाला समजेलच. मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजूनही मागितलेले नाही. त्यांच्याच पक्षाचे लोक राजीनामा मागत आहेत. त्यांचा राजीनामा घेणे किंवा न घेणे हे संपूर्णपणे अजित पवार यांच्या हातात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येबाबतचा लढा चालूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply