मुंबई -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येंनंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा दिलासा दिला आहे. आरोप सिद्ध होईपर्यंत कोणावरही कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही अशी भूमिका पवार यांनी घेतल्याने मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय तूर्तास मिटला आहे.
राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी ठाम भूमिका घेत, मुंडेंना पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. देवगिरी येथे पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत पवार यांनी जाहीरपणे सांगितले की, “आरोप सिद्ध होईपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही.” यामुळे राज्याच्या राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे.
देवगिरीवरील बैठकीत अजित पवारांची स्पष्ट भूमिका
राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत देवगिरी येथे पार पडलेल्या बैठकीत धनंजय मुंडेंच्या भवितव्यावर चर्चा झाली. साम टिव्हीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “फक्त आरोपांच्या आधारे निर्णय घेतले जाणार नाहीत. सत्य समोर येईपर्यंत मुंडेंना राजकीय आणि पक्षीय पाठिंबा दिला जाईल.”
भाजप आमदार सुरेश धस आणि इतर विरोधी पक्षनेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. त्यांनी याबाबत सरकारवरही टीका करत म्हटले की, “एका मंत्र्यावर अशा प्रकारचे आरोप होत असताना सरकार गप्प का?” यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह वाढला आहे.
विशेष म्हणजे, काल सुरेश धस यांनी अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पवारांनी ती टाळल्याचे समोर आले आहे. यामुळे राष्ट्रवादीमध्ये या विषयावर मतभेद असल्याचे स्पष्ट होत आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने त्यांचे राजकीय भवितव्य संकटात सापडले आहे. विरोधक या मुद्द्याचा मोठ्या प्रमाणावर चर्चा करत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, धनंजय मुंडेंवर कोणतीही कारवाई केल्यास त्याचा राष्ट्रवादीच्या गटबाजीवर परिणाम होईल. त्यामुळे अजित पवार सध्या सावध भूमिका घेत आहेत.
धनंजय मुंडे प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असून, विरोधक सतत सरकारला लक्ष्य करत आहेत. मात्र, अजित पवारांनी या संपूर्ण प्रकरणात स्पष्ट भूमिका घेत, मुंडेंना पाठिंबा दिला आहे.
Leave a Reply