News & View

ताज्या घडामोडी

ध्यानस्थ धनंजय अन व्रतस्थ गड!

विशेष संपादकीय /लक्ष्मीकांत रुईकर!

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने स्थापन झाले. मात्र गेल्या दोन महिन्यापासून राज्यात सरकार आणि त्यांचे विकासाचे निर्णय यावर चर्चा होणे दूरच राहिले. बीड जिल्ह्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि मंत्री धनंजय मुंडे या दिनाच्या गोष्टीवर मीडिया ट्रायल पहायला मिळाली. या सगळ्या परिस्थितीत मंत्री मुंडे हे भगवान गडावर मुक्कामी गेले. त्यावेळी मुंडे हे काहीवेळ भगवान बाबांच्या समाधीसमोर ध्यानस्थ बसले होते. तेव्हा त्यांच्या ध्यानस्थ प्रतिमेचे प्रतिबिंब समाधीवर अधोरेखित झाले. एका अर्थाने गडाच्या हृदयात धनंजय अन धनंजय च्या हृदयात गड असल्याची ही अनुभूती होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या साधूसंतांचे वचनाचा अनुभव सध्या धनंजय मुंडे घेत आहेत. तस तर 2009 साली त्यांना विधानसभा निवडणुकीत डावलले गेल्यापासून ते कठीण यातना भोगत आहेत. संघर्ष त्यांच्या जणू पाचवीलाच पुजला असल्याची परिस्थिती आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला अन धनंजय मुंडे हे दीड लाखाच्या आसपास मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित होता.

परंतु 9 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि मुंडे यांच्या मागे शुक्लकाष्ट लागले. या प्रकरणात मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड यांचे नाव आले आणि महायुतीसह महाविकास आघाडीतील अनेकांनी मुंडे यांना लक्ष्य केले. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना फाशीच झाली पाहिजे ही मुंडे यांची देखील. भूमिका आहे. परंतु जनमताच्या कौलामध्ये मुंडेना पराभूत करणे अशक्य आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांना पक्षांतर्गत आणि बाहेरून देखील टार्गेट करण्यात आले.

गेल्या दोन महिन्याच्या काळात धनंजय मुंडे यांच्या खाजगी आयुष्यापासून ते सार्वजनिक आयुष्यापर्यंत सगळ्याच नको त्या गोष्टी चव्हाट्यावर आणण्यात आल्या. कुठलाही थेट संबंध नसताना तेच मुख्य आरोपी असल्याप्रमाणे त्यांना दोषी गृहीत धरून साप साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रयोग करण्यात आला. यांतून त्यांनी किती वेदना अन अपमान सहन केला असेल हे त्यांनाच माहित पण त्यांच्या विरोधकांना जो आसुरी आनंद झाला होता त्यापुढे त्या कमीच असतील हे नक्की. एवढ्या सगळ्या अग्निदिव्यातून ते बाहेर पडतील कि नाही, कधी पडतील याबाबत अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जातं होत्या.

तब्बल पन्नास -बावन्न दिवस मीडिया ट्रायल मुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय यांनी शेवटी गडाच्या चरणी नतमस्तक होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी गडावर गेलेल्या धनंजय यांनी भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तेव्हा मुंडे हे पंधरा वीस मिनिटे समाधीसमोर ध्यानस्थ बसून होते. त्यावेळीचा त्यांचा हा फोटो आहे ज्यामध्ये त्यांचे प्रतिबिंब हे समाधीवर दिसून आले.

विशेष बाब म्हणजे समाधीला संपूर्ण काळे ग्रेनाईट लावण्यात आले आहे, त्यावर रिफलेक्शन दिसते मात्र या फोटोत जे रिफलेक्शन दिसलें ते आरश्याप्रमाणे स्वच्छ असल्याचे पहायला मिळाले. मी अंधश्रद्धाळू नाही पण श्रद्धाळू जरूर आहे. हा दैवी चमत्कार म्हणावा कि काय यावर चर्चा होऊ शकते. पण हा फोटो पाहिल्यानंतर जाणवले ते म्हणजे गडाच्या हृदयात धनंजय आणि धनंजय च्या रोमारोमात गड आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात थेट कुठेही धनंजय मुंडे यांचा सहभाग नाही पण तरीही त्यांना ज्या पद्धतीने टार्गेट केले गेले आहे ते एखाद्याला आयुष्यातून उठवण्याची सुपारी घेतल्यासारखेच वाटते. देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या आणि त्यावरून सुरु असलेले राजकारण किळसवाणे आहे.

तब्बल दोन महिने या सगळ्या दुष्टचक्रातून पिळून निघालेल्या धनंजय यांना जर गडाच्या चरणी लिन किंवा नतमस्तक व्हावे वाटले असेल तर त्यात गैर काय आहे, पण त्यावरून देखील त्यांना टार्गेट केले गेले. पण गड आणि महंत नामदेव शास्त्री हे ज्या खंबीरपणे मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिले ते पाहता पुढच्या वाटचालीत गड आणि गडाचे भक्त ठामपणे त्यांच्यासोबत असतील आणि मुंडे हे या चक्रव्यूव्हातून बाहेर पडून आपण अभिमन्यू नाही तर धनंजय आहोत हे सिद्ध करतील अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *