पाटोदा-पालकमंत्री असताना जिल्ह्यासाठी माझा प्रत्येक क्षण न क्षण उपयोगात आणला. विकासाबरोबरच समाजातील वंचित पिडित घटकांना न्याय देण्याचे काम केले. आता देखील मला जे खाते मिळाले आहे, त्यातून जिल्हयाला अभिमान वाटेल असेच काम माझ्या हातून होईल असं राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी येथे सांगितलं. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका. मी कशाला नवा पक्ष काढेल? असा खडा सवाल त्यांनी यावेळी केला.
महासांगवी येथे श्रीसंत मीराबाई आईसाहेब यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, पंचकुंडी महायज्ञ आणि श्री भगवान शंकराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मीराबाई संस्थानच्या मठाधिपती ह.भ.प.राधाताई सानप, उद्योजक विवेक देशपांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, विजय गोल्हार, मधुकर गर्जे, महेंद्र गर्जे, अजय धोंडे, अनुरथ सानप, सूर्यभान बरके आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. पंकजाताई म्हणाल्या, राधाताई सानप महाराज जरी आध्यात्मिक क्षेत्रात असल्या, कीर्तनकार असल्या तरी त्यांच आणि माझं मैत्रीणीचं नात आहे. लोकनेते मुंडे साहेबांपासून मी याठिकाणी दरवर्षी येते ते केवळ आपल्या माणसांसाठी.. राजकारण आणि धर्मकारण यात काम करणारांनी समाजाच्या भल्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी समाजावर केलेले संस्कार विसरून चालणार नाही, त्यांचं सत्व आणि तत्व खूप मोठं होतं. संपूर्ण जीवन समाजाला वाहून देणं एवढं सोप काम नाही असं सांगत माझी भगवान बाबांवर नितांत श्रध्दा आहे, डोळे बंद केले तरी मला ते साक्षात समोर असल्याची जाणीव होते असं त्या म्हणाल्या.
अभिमान वाटेल असंच काम माझ्या हातून होईल
याठिकाणी आपण माझे अभूतपूर्व असे जे स्वागत केले त्याने खरोखरच मी भारावून गेले. मोठे हार, गुच्छ यापेक्षा फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून आपण केलेले स्वागत अंतःकरणातून होते, आपली प्रत्येक पाकळी मला एक एक टन वजनाची वाटली, एवढं प्रेम आपण करता असं त्या म्हणाल्या. पालकमंत्री असताना जिल्ह्यासाठी माझा प्रत्येक क्षण न क्षण उपयोगात आणला. विकासाबरोबरच समाजातील वंचित पिडित घटकांना न्याय देण्याचे काम केले. आता देखील मला जे खाते मिळाले आहे, त्यातून आपल्याला अभिमान वाटेल असेच काम होईल असं त्या म्हणाल्या. महायुतीत परळी राष्ट्रवादीकडे असली तरी आष्टी भाजपकडे आहे, त्यामुळे याठिकाणी प्रत्येक कामात लक्ष घालणार आहे. याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तसा घेऊ नका असं त्यांनी आवर्जून सांगितलं.
ग्रामविकास खाते असताना शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्याचा निर्णय घेऊन त्यांची होणारी पिळवणूक मी थांबवली असं सांगत हे सर्व करत असताना कुणाच्या चहाची मी मिंधी नाही असं त्यांनी ठणकावून सांगितले. ऊसतोड मजूरांच्या दरात वाढ करून दिली, त्यांच्या प्रश्नांसाठी पुढेही लढत राहू असं त्यात म्हणाल्या.
मी कशाला नवा पक्ष काढेल?
कोयत्यांना धार देण्यासाठी मी कायम उभी राहील असे म्हणत चुकीचा अर्थ घेऊ नका. मी कोणत्या गुंडाला घाबरत नाही. मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. मी कशामुळे नवीन पक्ष स्थापन करेल? दिल्लीमध्ये नरेंद्रजी मोदी यांची सत्ता आहे.
राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. मी स्वतः मंत्री आहे असे असताना मी नवीन पक्ष का काढेल ? असा स्पष्ट सवाल त्यांनी केला.
मंत्री म्हणून नाही तर भाविक म्हणून इथे आले
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांवर तुम्ही खूप प्रेम करत होता, त्यांच्या नंतर ते स्थान तुम्ही मला दिले, एवढे प्रेम मी कधीही विसरू शकत नाही. मंत्री म्हणून नाही तर गडाची एक भाविक या नात्याने मी इथे आले, असंच प्रेम कायम रहावे असं सांगून त्या म्हणाल्या, संत भगवान बाबा आणि संत वामनभाऊ यांनी आपल्याकडे अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू केली ती केवळ तरूण पिढीवर संस्कार, व्यसनापासून दूर आणि चांगले कर्म घडावेत यासाठी सुरू केली. आजच्या तरुणांनी आपल्या संतांचे विचार आचरणात आणून जीवन समृद्ध करावे असं त्या म्हणाल्या.
हेलिकॉप्टरने आगमन
शासकीय बैठका आणि कार्यक्रमाची व्यस्तता असतानाही त्यातून वेळ काढत ना. पंकजाताई मुंडे सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला खास हेलिकॉप्टर घेऊन महासांगवीत आल्या. यावेळी त्यांचं भाविक आणि ग्रामस्थांच्या जेसीबीतून फुलांची उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आलं. श्री भगवान शंकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आली.
Leave a Reply