बीड -गेल्या पंधरा वीस वर्षांपासून परळी येथेच कार्यरत असलेल्या भास्कर केंद्रे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या नावावर शंभर हायवा आहेत. अवैध धंदे करणाऱ्या सोबत त्याची पार्टनरशिप आहे, वाळू असो जी राख प्रत्येक वाहतुकीत याचा हिस्सा आहे असा आरोप करत भाजपचे आ सुरेश धस यांनी खळबळ उडवून दिली आहे. जिल्ह्यात दोनशे पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी हे वाल्मिक कराड च्या जवळचे आहेत असा आरोपही धस यांनी केला आहे. केंद्रे सारख्याना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
२०-२० वर्षे अधिकारी एकाच ठिकाणी कसे काय काम करू शकतात? असा सवाल उपस्थित करून भास्कर केंद्रे हा पोलीस १५ वर्षांपासून परळीमध्ये असल्याचे सांगत त्याच्याकडे १५ जेसीबी, १०० राखेचे टीपर आणि तेथील मटका व्यावसायिकासोबत भागिदारी असल्याचे आरोप करून भाजप आमदार सुरेश धस यांनी परळीच्या पोलिसाचा पंचनामा केला.
भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत सौरभ भोंडवे खून प्रकरण, महादेव मुंडे खुनाची चौकशी, भगिरथ बियाणी खून प्रकरण तसेच बीडमधील पोलिसांच्या बदल्यांचा विषय आदी प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी चर्चा केली. तसेच परळी नगर परिषदेचे ऑडिट व्हावे, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
सुरेश धस म्हणाले, परळीतील राखेचे साठे जप्त करण्यात यावेत. राखेचे डेपो कुणाचे याची नावे मी समोर आणणार आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील राखेची वाहतूक बंद झाली मात्र आमच्या जिल्ह्यात कशी काय चालू आहे, असा सवालही धस यांनी उपस्थित केला.
परळीतल्या केंद्रे नावाच्या पोलिसाकडे १५ जेसीबी, १०० राखेचे टीपर
बीड जिल्ह्यात आणि परळीत अनेक वर्षांपासून काही पोलीस अधिकारी नोकरीला आहेत. त्यांना नेमका कुणाचा आशीर्वाद आहे? भास्कर केंद्रे हा पोलीस १५ वर्षांपासून परळीत आहे. त्याच्याकडे १५ जेसीबी, १०० राखेचे टीपर आणि तेथील मटका व्यावसायिकाबरोबर त्याची भागिदारी आहे, असे आरोप धस यांनी केले. मी केवळ सांगतोय म्हणून तुम्ही ऐकू नका, तुम्ही एकदा परळीत जाऊन बघा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
परळीत एकाच रस्त्याची पाच पाच वेळा बीले घेतलेली आहेत. खून प्रकरणात अटकेत असलेल्या विष्णु चाटेने ४६ कोटी रुपये बील घेतले आहे, असा आरोपही धस यांनी केला. वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबतच्या आरोपींना फरार काळा कुणी कुणी मदत केली, हे तपासून संबंधित पोलिसांवर कारवाई करा. चौकशीअंती दोषी आढळले तर त्यांना बडतर्फ करा, अशी मागणीही धस यांनी केली.
Leave a Reply