बीड -सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.आमच्याकडून तपास पूर्ण झाला आहे, असे गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाला सांगितले. बुधवारी विशेष न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मिक याआधी जवळपास २१ दिवस पोलीस कोठडीत होता.
बीडच्या मोका विशेष न्यायालयात बुधवारी साडेअकरा वाजता वाल्मिक कराड याच्या सुनावणीला सुरुवात झाली. सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराड याला दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) हजर केले गेले. त्या अगोदर वाल्मिक कराड याची वैद्यकीय तपासणी केली गेली. वाल्मिक कराडला सर्दी, ताप, खोकला असल्याने वैद्यकीय पथकाने गोळ्या औषधे दिली, अशी माहिती डॉक्टर अमोल जोगदंड यांनी दिली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे. खुनाच्या कटात संशयित म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. तसेच खंडणी प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणातल्या दोन्ही गुन्ह्यात कराडला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. चौकशी पूर्ण झाल्याने सीआयडीने वाल्मिक कराडची कोठडी मागितलेली नाही.
वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने जामीनासाठी अर्ज करता येऊ शकतो. मात्र मकोकाचा गुन्हा दाखल असल्याने सहजासहजी जामीन मिळत नाही. साधारण सहा महिने जामीन मिळत नाही. वाल्मिक कराड याच्या वतीने त्याचे वकील जामिनासाठी अर्ज करू शकतात. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी वकील त्याला जामीन देऊ नये, असा प्रयत्न करतील.
केज तालुक्यातील मस्साजोग गावात आवादा कंपनीचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाकडे वाल्मिक आणि त्याच्या गँगने २ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यातील ५० लाख रुपये निवडणूक काळात दिले गेल्याचेही भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. तसेच उर्वरित रकमेची खंडणी मागण्याकरिता ज्यावेळी वाल्मिकची गँग गेली तिथेच सुरक्षारक्षकाशी बाचाबाची झाल्यानंतर संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली. आपल्या खंडणी प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात ठेवून संतोषची हत्या झाल्याचे सांगितले जाते. खंडणी आणि खून प्रकरण एकमेकांशी संलग्न असल्याने दोन्ही प्रकरणांचा तपास सीआयडी आणि एसआयटीमार्फत केला जात आहे.
खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड तब्बल १५ दिवसांनी पोलिसा समोर आला. त्यानंतर १४ दिवसांच्या पोलीस तपासात खंडणी आणि खून प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला. त्यानंतर त्याच्यावर खुनाच्या कटात संशय असल्याचे कलम आणि मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.
Leave a Reply