पुणे -जर एखाद्या व्यक्तीचा एखाद्या प्रकरणात दोष नसेल तर त्याच्यावर अन्याय होता कामा नये असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकारणावरून विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशावेळी अजित पवार यांनी ठामपणे मुंडे यांच्या राजीनाम्या बाबत भूमिका घेतली आहे.
भाजप आमदार सुरेश धस सातत्यानं आका असा उल्लेख मुंडे यांना लक्ष करत आहेत. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मौन चर्चेचा विषय आहे. अखेर अजित पवारांनी या प्रकरणावर पुण्यात मौन सोडलं. मंत्री धनंजय मुंडेंनी सरपंच संतोष देशुमख यांच्या प्रकरणात अजित पवारांशी काय चर्चा केली, याविषयी अजित पवारांनी स्पष्टच सांगितले आहे.
संतोष दशमुखांच्या हत्येची चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी यासाठी मंत्री धनजंय मुंडेच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून दबाव वाढत आहे. एवढच नाही तर काही दिवसापूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी देखील केली. त्यानंतर तडकाफडकी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. राजीनाम्यावरून दबाव वाढल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची मंत्रालयातील दालनात भेट घेतली होती. त्यानंतर आज पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अजित पवार म्हणाले, आतापर्यंत खूप जणांवर आरोप झाले आहेत. पण त्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. काही जणांनी आरोपांना व्याकुळ होऊन राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडेंचे स्पष्ट मत आहे की त्यांचा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही. कुठल्याही एजन्सीला या प्रकरणाचा तपास करायला द्या. आता या प्रकरणात तीन एजन्सी तपास करत आहेत अजून दुसरी एखादी एजन्सी लावा आणि तपासायला सांगा, असे एखादी व्यक्ती ठामपणे सांगत असेल तर त्यावेळी काम करताना कोणी दोषी नसणाऱ्यांवरही अन्याय होता कामा नये.यामध्ये जो कोणी दोषी असेल अजित पवार असले तरी कारवाई होईल.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना अजित पवार म्हणाले, या प्रकरणाची सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होत आहेत. या प्रकरणात जर कोणी दोषी असेल तर त्यांना पाठिशी घालणार नाही. या प्रकरणात आम्ही कोणालाच सोडणार नाही. अजित पवार दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. पक्ष न पाहता दोषींवर कारावाई केली जाणार आहे. आम्ही हत्या प्रकरणात राजकारण आणणार नाही.
Leave a Reply