News & View

ताज्या घडामोडी

सोनवणे, धस, क्षीरसागर, सोळंके यांना सुरक्षा पुरवा -शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

मुंबई -बीड जिल्ह्यातील मसाजोग येथे घडलेल्या हत्येनंतर जिल्ह्यात वातावरण संवेदनशील आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी आरोपीवर कारवाईसाठी आवाज उठवला आहे. यातील आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता बीडचे खा बजरंग सोनवणे, आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ प्रकाश सोळंके यांना शासनाच्या वतीने सुरक्षा पुरविण्यात यावी असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे खा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

खा पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे कि,संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते. बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे आणि त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत.
असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागणी केली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सीआयडीने सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यासह इतरही आरोपींवर या आधी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील अनेक गुन्हे या आरोपींनी एकत्रितपणे कट रचुन केल्याचे दिसून येत असल्याने सीआयडीकडून या टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसे घडल्यास वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे संतोष देशमुख हत्याप्रकरणात पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


तर दुसरीकडे या प्रकरणावरून विरोधी बाकावरील नेत्यांसह सत्तेतील नेत्यांनीही धनंजय मुंडे आणि इतर संबंधितांवर आरोप करत केले आहे. दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी शरद पवार  यांनी निवेदनात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *