पुणे -संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनी पोलिसांसमोर सरेंडर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, आंधळे व इतरांनी अमानुष पद्धतीने ही हत्या केली होती.
या हत्येनंतर बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली होती. यामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप झाला. त्यानंतर कराड यांच्यावर खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. 31 डिसेंबर रोजी कराड याने सी आय डी कार्यालय पुणे येथे सरेंडर केले. त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
दरम्यान या प्रकरणातील घुले आणि इतर आरोपी फरार असल्याने मसाजोग ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. अखेर घुले आणि सांगळे या दोघांनी पोलिसासमोर शरणागती स्वीकारली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कराड ज्या पुण्यात शरण आला त्याच पुण्यात हे दोन आरोपी शरण आल्याची माहिती आहे.
कराड ची विनंती न्यायालयाने फेटाळली!
खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडने केज न्यायालयात विनंती अर्ज करून आपल्याला ‘स्लीप ऑप्निया’ नावाचा दुर्धर आजार असून त्यासाठी बायसॅप मशीन आणि 24 तासांसाठी एक मदतनीस देण्याची मागणी केली. बायसॅप मशीनशिवाय आपण झोपू शकत नाही, असेही त्याने अर्जात म्हटले होते. मात्र केज न्यायालयाच्या न्या. ए.व्ही. पावसकर यांनी वाल्मीक कराडचा हा विनंती अर्ज फेटाळला.
मुंबईतून एकजण ताब्यात!
या दोन मुख्य आरोपींसह पोलिसांनी आणखी एका जनाला ताब्यात घेतले आहे. संशयिताचं नाव सिद्धार्थ सोनवणे असून देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी तो बीडमध्ये होते. यानेच मारेकऱ्यांना संतोष देशमुख यांच्या लोकेशनची टीप दिली होती, असा आरोप आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले पोलिसांच्या हाती लागल्याने या संपूर्ण प्रकरणाचा आता उलगडा होऊ शकतो. सगळा घटनाक्रम पोलिसांना समजू शकतो.
पुण्यात नेमकं काय घडलं!
संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलीस, एसआयटी आणि सीआयडी एक्शनमोडमध्ये आले आहेत. त्यांनी शुक्रवारी डॉ. संभाजी वायबसे आणि त्याच्या वकील पत्नीला ताब्यात घेतलं आहे. डॉक्टर वायबसे याने देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला घटनेच्या दिवशी संपर्क केल्याचा आणि त्याला पैसे पुरवले, अशी चर्चा आहे. डॉक्टर वायबसे हा ऊसतोड कामगारांचा मुकादम म्हणून काम करतो. या वायबसे दाम्पत्याला पोलिसांनी नांदेडमधून ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत एसआयटीनं त्यांची चौकशी केली आहे. यातून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.
दुसरीकडे, बीड पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी पहाटे मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी पुण्यातून या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचा साथीदार सुधीर सांगळे याला अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी पहाटे दोघांना अटक केली आहे. त्यांना बीडला आणलं जात असून लवकरच पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर केलं जाणार आहे. या अटकेच्या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.
Leave a Reply