News & View

ताज्या घडामोडी

suresh dhas and prajakta mali

राजकारणासाठी धस यांनी नीच पातळी गाठली -प्राजक्ता माळी!

मुंबई – एका सांस्कृतिक कार्यक्रमात एका मंत्र्यासोबत सत्काराचा एक फोटो घेऊन मागील दीड महिन्यापासून माझी बदनामी केली जात असून अत्यंत हतबल होऊन एक गरीब कुटुंबातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली महिला म्हणून मी मागच्या दीड महिन्यापासून ते सहन करत आहे, मात्र आमदार सुरेश धस यांनी कालपासून अत्यंत कुत्सित भावनेने माझे नाव परळीच्या नेत्यांशी जोडून राज्यभरात बदनाम केले आहे. याचा मी तीव्र शब्दात निषेध करते. सुरेश धस सारख्या नीच प्रवृत्तींना स्वबळावर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या महिला कलाकार चालत नाहीत का? तुमच्या राजकीय स्वार्थासाठी आमच्यासारख्या महिलांना का बदनाम करता? असा परखड सवाल आज अभिनेत्री प्राजक्ता माळी ने पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.दरम्यान आपण काहीही चुकीचे बोललो नाही, त्यामुळे आपण माफी मागणार नाही अशी प्रतिक्रिया आ सुरेश धस यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केली.

सुरेश धस यांनी माझ्यासह काही महिला कलाकारांचे नाव घेऊन जे कुत्सित बुद्धीचे व नीच वक्तव्य केले, त्यावेळी बोलतानाचा त्यांचा हावभाव, त्यांची नक्कल करण्याची पद्धत आणि हशा पिकवण्याचा उद्देश, हा अत्यंत क्लेशदायक व बदनामीकारक होता. अनेक वर्ष कष्ट घेऊन आम्ही इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले आहे. तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी कष्टाने नाव कमावलेल्या सावित्रीच्या लेकींची महिलांची इमेज डागाळणे योग्य आहे का, असा उद्विग्न सवाल प्राजक्ता माळी यांनी उपस्थित केला आहे.

कुणी स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी असं महिला कलाकारांचे नाव घेऊन त्यांच्यावर कुठलाही पुरावा नसताना हवे ते आरोप करायचे, आणि वेगवेगळे पोर्टल, सोशल मीडिया, युट्यूब चैनल या माध्यमातून एका प्रश्नाचे हजार प्रश्न तयार करून एखाद्या महिला कलाकाराची बदनामी करायची हे योग्य नसून एखाद्याला आयुष्यातून संपवण्यासारखे आहे. त्यामुळे मी राज्य महिला आयोगाकडे सुरेश धस यांच्या विरोधात रीतसर तक्रार आज दुपारी केली असून, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देखील विनंती करत आहे की, आपल्या स्वार्थासाठी आणि आपले राजकारण साधण्यासाठी महिला कलाकारांना सावित्रीच्या लेकींना असे टार्गेट करणाऱ्या लोकांवरती आणि अफवा पसरवणाऱ्या व निराधार गोष्टींचा बाऊ करणाऱ्या सोशल मीडिया वरती सुद्धा ठोस कारवाई करावी, अशी मागणीही अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केली आहे.

तर दुसरीकडे प्राजक्ता माळी यांच्यासह विविध अभिनेत्रींचे नाव घेऊन कशा कंबर हलवतात बघा असली घाणेरडी वक्तव्य करून सुरेश धस अद्यापही नाम निराळे आहेत तसेच त्यांनी आपल्यातली मग्रुरी कायम ठेवत प्राजक्ता माळी यांची माफी मागण्यास नकार दिला आहे.

माफी मागणार नाही – धस!

आपण काहीही चुकीचे बोललो नाही, त्यामुळे आपण माफी मागणार नाही असा म्हणत आ सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणावरून लक्ष्य विचलित करण्यासाठी हा सगळा प्रकार सुरु आहे अशी प्रतिक्रिया आ धस यांनी दिली. तसेच त्यांनी माझा निषेध केला आहे म्हणून आपण महाराष्ट्राची हास्यजत्रा यापुढे बघणार नाही असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *