केज -संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्राला न शोभणारी घटना आहे. आपल्याला दहशतीतून बाहेर पडावे लागेल. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर शरद पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी कुटुंबाने संरक्षणाची मागणी केली. संतोष यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याची घोषणा पवार यांनी केली.
“बीड जिल्ह्यात जे घडलं, ते कुणालाही न पटणारे आहे. बीड जिल्ह्यात घडलेलं चित्र अतिशय गंभीर प्रकारचं आहे. बजरंग सोनवणे यांनी लोकसभेत हा प्रश्न मांडला. गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली. यानंतर राज्यात काय चाललंय, असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. मात्र, सूत्रधाराच्या खोलात गेले पाहिजेत. विधानसभेत संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांनीही हा प्रश्न मांडला आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं.
“बीडमध्ये दहशतीचं वातावरण आहे. पण, दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडा. याला सगळेजण तोंड देऊ. सामूदायिक प्रयत्नांची भूमिका घेतल्यानंतर कुणीही आपल्याला आडवू शकत नाही. महाराष्ट्रात आणि बीड जिल्ह्यात, असं घडतंय ही गोष्ट न शोभणारी आहे. संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेणार आहे,” असं शरद पवार म्हटलं.
यानंतर आमदार संदीप क्षीरसगार यांनी शरद पवार यांच्यासमोर मास्टरमाइंड म्हणत वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं. तेव्हा, सगळे स्तब्ध होऊन क्षीरसागर यांच्याकडे पाहतच राहिले.
संदीप क्षीरसागर म्हणाले, “मास्टमाइंड हा फक्त वाल्मिक कराड आहे. बीड हा पुरोगामी आणि शरद पवार यांना मानणारा जिल्हा आहे. वाल्मिक कराडनं बीड जिल्हा नासवण्याचं काम केलं आहे. दोन समाजात तेढ निर्माण झाले आहेत. आपल्याला रडून चालणार नाही. घाबरण्याची आणि कुणाला भिण्याची गरज नाही. न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.”
“वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यास उशीर लावला. तसेच, अटकही झाली नाही. नाव घेण्यास सुद्धा लोक कचरत आहे. दोन समाजात भांडणे लावण्याचं काम, हा माणूस करत आहे,” असं म्हणत क्षीरसागर यांनी कराडवर हल्लाबोल केला आहे.
Leave a Reply