News & View

ताज्या घडामोडी

कड्यातील रेकॉर्डब्रेक सभेने धस यांच्या विजयावर शिक्कामोर्तब!

कडा -आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचाराची सांगता आ पंकजा मुंडे यांच्या कड्यातील रेकॉर्डब्रेक सभेने झाली. सुरेश धस यांचा विजय म्हणजे माझी शक्ती वाढवणारा आहे त्यामुळे कोणतीही शंका ना ठेवता कमळाला मतदान करा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.


आष्टी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना रिपाई (आठवले गट )आणि मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये त्या बोलत होत्या


पुढे बोलताना आ.पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, सुरेश धस हे उमेदवार अत्यंत कष्ट करणारे अनेक वर्ष काम करणारे जनतेचे प्रश्न माहीत असणारे व्यक्तिमत्व असून मी ग्रामीण विकास मंत्री असताना त्यांनी बीड जिल्हा परिषद भाजपाच्या ताब्यात दिली.त्यावेळी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे बेरजेचे राजकारण करत असतात मी सुरेश धस यांना सोबत घेऊन गुणाकार करण्याचे राजकारण केले बीड जिल्ह्यामध्ये चांगलं कष्ट करणार चांगलं नेतृत्व पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन कामाचं गणित मांडलं आणि जिल्हा परिषदे वर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आणि आम्ही रक्ताचे पाणी, करून कमळ फुलवले आहे ते कमळ मुंडे साहेबांनी सुरेश धस यांचे हाती दिले. आणि मी आज परत ते सुरेश धस यांच्या हाती सुपूर्द करत आहे.


सुरेश धस हे गोरगरिबांना सतत मदत करणारे कष्ट करणारे शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत असणारे उमेदवार आहेत लोकांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांच्या पाठीवर हात ठेवून बोलणारं हे व्यक्तिमत्व असून त्यांच्या एवढे कष्ट कोणीही घेऊ शकत नाही हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे.


आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि आमच्या राजकीय घराण्याला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे त्यामुळे आता सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन करून त्या म्हणाल्या की, माझी आणि सुरेश धस यांची शक्ती एकत्र येऊन राजकीय वज्रमुठ बांधली जाणार आहे असेही त्या म्हणाल्या.


या जाहीर सभेसाठी मतदार संघातील महिला भगिनीचे मोठ्या प्रमाणात आकर्षण होते तर नागरिकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. भाषण सुरू असताना देखील माणसांचा लोंढाच लोंढा सभेकडे येताना दिसत होता.

आष्टी मतदारसंघात भाजपचे काही पदाधिकारी किंवा गावापातळीवरील नाराज नेते धस यांच्या प्रचारात सक्रिय नसल्याचे पंकजा मुंडे यांना लक्षात आले, त्यांनी या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांची कड्यात एक बैठक घेतली. यामध्ये जे झालं ते विसरून कामाला लागा, मला सुरेश धस विधानसभेत पाहिजेत असे सांगितले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड थांबवणार साखर कारखाना उभारणार
-सुरेश धस

आष्टी,पाटोदा, तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळप करण्यासाठी इतर कोणाच्याही दारात जावे लागणार नाही यासाठी आपल्या हक्काचा खासगी साखर कारखाना उभारणीसाठी काम सुरू असून लवकरच हा साखर कारखाना उभा राहणार आहे त्या ठिकाणी वीज निर्मिती आणि इथेनॉल निर्मिती देखील होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची सोय आणि रोजगार देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत.यासाठी मला तुम्ही पुढचे पाच वर्ष काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती सुरेश धस यांनी केली

सभेच्या सुरुवातीला कडा शहरातून सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्या उपस्थितीत महिलांची भव्य प्रचार फेरी संपन्न झाली ज्यामध्ये हजारो महिलांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *